मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि लाल समुद्रातील (Red Sea) जहाजांवरील हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि तुर्की या देशांनी आता व्यापारासाठी समुद्राऐवजी जमिनीवरून जाणारे नवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. ‘स्ट्रेथ ऑफ होर्मुझ’ आणि लाल समुद्रावरील अवलंबित्व कमी करणे, हा या हालचालींमागचा मुख्य उद्देश आहे.
काय आहे ही नवीन योजना?
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, हे देश रेल्वे मार्ग, पाइपलाइन आणि जमिनीवरून जाणाऱ्या मालवाहतूक मार्गांचे जाळे विणत आहेत. या योजनेनुसार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमधील बंदरांवर उतरलेला माल रेल्वेने सौदी अरेबिया आणि जॉर्डनमार्गे थेट भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचवला जाईल. यामुळे जहाजांना धोकादायक समुद्री मार्गांऐवजी सुरक्षित जमिनीवरून प्रवास करता येईल.
महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रगती
सौदी आणि युएईने आधीच काही जमिनीवरून जाणारे कॉरिडॉर कार्यान्वित केले आहेत. ‘नेओम’ बंदरापासून सुएझ कालव्यापर्यंत आणि इराकमर्यंत नवीन कार्गो सेवा सुरू करण्यात आली आहे. जेद्दाह ते इस्तंबूल (तुर्की) यांना जोडणाऱ्या जुन्या ‘हिजाज रेल्वे’ मार्गाचे ऐतिहासिक हिजाज रेल्वेचे पुनरुज्जीवनाचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत सौदी, तुर्की आणि जॉर्डनमध्ये चर्चा सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या सौदीमधील शिखर परिषदेत सौदी अरेबिया, यूएई, कतार, ओमान, कुवेत आणि बहरीन या सहा देशांना जोडणाऱ्या ‘रिजनल रेल्वे नेटवर्क’ला गती देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.
केवळ व्यापारच नाही, तर ऊर्जा सुरक्षाही महत्त्वाची
केवळ मालाची वाहतूकच नाही, तर हे देश एकमेकांना तेल आणि नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनने जोडण्याचाही विचार करत आहेत. याशिवाय, वीज वहन करणाऱ्या यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे जाळेही या नवीन कॉरिडॉरचा भाग असणार आहेत.
या बदलाचे महत्त्व काय?
तज्ज्ञांच्या मते, हा एक “मोठा धोरणात्मक बदल” आहे. आत्तापर्यंत आखाती देशांचा व्यापार प्रामुख्याने समुद्रमार्गावर अवलंबून होता. मात्र, युद्धाची परिस्थिती आणि सागरी हल्ल्यांमुळे हा मार्ग असुरक्षित बनला आहे. नवीन जमिनीवरील मार्गांमुळे व्यापाराला सुरक्षा मिळेल आणि वेळेचीही बचत होईल. डीपी वर्ल्ड आणि अबू धाबी पोर्ट्स सारख्या बड्या कंपन्यांनी आता जॉर्डन, सीरिया आणि इजिप्तमधील बंदरांचे व्यवस्थापन घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या पूर्ण क्षेत्रावर त्यांचे व्यावसायिक नियंत्रण मजबूत होईल.
