Iran VS Israel War : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून दोन्ही देशांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी होत आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या संघर्षात अमेरिकेनेही एन्ट्री केली आहे. २२ जून रोजी अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले करत इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इराणने संताप व्यक्त करत थेट अमेरिकेलाही प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (२३ जून) इस्रायलने इराणच्या फोर्डो या अणुकेंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इराणी माध्यमांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे प्रेरित झालेल्या इस्रायलने तेहरानवर हवाई हल्ले वाढवले असून इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर तीव्र स्वरुपाचे हल्ले करण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
फोर्डोचे मोठे नुकसान
अमेरिकेने हवाई हल्ल्यात बंकर बस्टर बॉम्ब आणि टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात फोर्डोचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे. मात्र, अमेरिकेने हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्रायलनेही हल्ला केला आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’चा किती परिणाम झाला? हे अद्याप स्पष्ट सांगितलेलं नाही, फक्त नुकसान झाल्याचा दावा केलेला आहे. मात्र, वापरण्यात आलेले स्फोटके पाहता खूप मोठे नुकसान झालं असल्याची शक्यता आहे, असं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी संस्थेच्या एका आपत्कालीन बैठकीत सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे ३ अणुकेंद्र नष्ट झाले का?
अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला असून यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे इराणचे ३ अणुकेंद्र नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.