Iran US War Fighter Jet Shot Down: मध्यपूर्वेतील युद्धातून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नसताना आता हे युद्ध आणखी गंभीर वळणावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. इराणमध्ये जमिनीवरून हल्ला करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र त्यानंतर त्यांनी भूमिका बदलत युद्धविरामाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तरीही अमेरिकन लष्कराची विमाने इराणच्या आकाशात घिरट्या घालत आहेत. इराणच्या हवाई क्षेत्रावर आम्ही सहज वावरू असा अमेरिकेचा विश्वास होता. मात्र इराणने याला जबरदस्त तडाखा दिला असून अमेरिकेचे दोन लढाऊ विमाने पाडली आहेत.
शुक्रवारी इराणने अमेरिकेची दोन लष्करी विमाने पाडल्याचा दावा केला. तसेच शोधकार्यात गुंतलेल्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सवरही हल्ला केला. याचा अर्थ इराण अमेरिकेपेक्षा लष्करीदृष्ट्या वरचढ आहे, असे अजिबात नाही. मात्र त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याची मात्र पुरती हवा काढली आहे. जगातील शक्तिशाली हवाई दल असलेल्या अमेरिकन अत्याधुनिक लढाऊ विमानांना इराणने कसे लक्ष्य केले? हे जाणून घेऊ.
अमेरिका इराणच्या डावपेचांपासून गाफील
अमेरिका आणि इस्रायलपेक्षा लष्करीदृष्ट्या कमकुवत असूनही इराणने ३६ हून अधिक दिवस युद्धात तग धरलेला आहे. युद्धात गनिमी काव्याची (Asymmetric Warfare) पद्धत अवलंबून इराणने अमेरिकेला धक्का दिला. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेले युद्ध एप्रिलमध्येही सुरू आहे. मात्र अद्यापही अमेरिका इराणच्या डावपेचांपासून गाफील असल्याचे दिसते.
शुक्रवारी इराणने अमेरिकेचे एफ-१५ई स्ट्राइक ईगल हे लढाऊ विमान पाडले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने याचे श्रेय एका नवीन संरक्षण प्रणालीला दिले. यानंतर काही तासांत एफ-१५ च्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आलेल्या अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सनाही इराणने लक्ष्य केले. मात्र इराणच्या हवाई हद्दीतून दोन्ही हेलिकॉप्टर बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.
याचदरम्यान अमेरिकेचे दुसरे ए-१० वॉरहॉग विमानही कुवेतवर कोसळले. दोन दशकात प्रथमच अमेरिकेची लढाऊ विमाने शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यात पाडण्यात आली आहेत. यापूर्वी २००३ साली इराकमधील लढाईदरम्यान अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले गेले होते. त्यामुळे अमेरिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इराणच्या हवाई क्षेत्रावर आपले पूर्ण नियंत्रण असून तेहरानकडे कोणतीही विमानविरोधी यंत्रणा नसल्याचे वारंवार सांगितले होते. मात्र तरीही इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यावरून त्यांच्या लढाऊ वृत्तीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प २४ मार्च रोजी म्हणाले होते, “आमची विमाने अक्षरशः इराणच्या आकाशात विनासायास फिरत आहेत. त्यांना धक्काही लागू शकत नाही.” मात्र या विधानाच्या काही दिवसानंतर लगेचच इराणने ट्रम्प आणि जगाला वास्तव दाखवून दिले.
इराणने अमेरिकेची विमाने कशी पाडली?
अमेरिकेची विमाने कशी पाडली, हे इराणने अद्याप उघड केलेले नाही. तरी विश्लेषकांच्या मते, हे माजिद इन्फ्रारेड हवाई संरक्षण प्रणाली किंवा खांद्यावरून डागता येणारी क्षेपणास्त्रे वापरून विमानांना लक्ष्य केले असावे. ज्यांचा शोध घेणे कठीण असते. १९ मार्च रोजी अमेरिकेचे सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमान असलेल्या एफ-३५ वर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या माजिद प्रणालीचाच हात असल्याचे मानले जाते.
माजिद हवाई संरक्षण प्रणाली काय आहे?
इराणने २०२१ साली माजिद प्रणालीचा वापर सुरू केला. कमी उंचीवरून उडणाऱ्या लढाऊ विमानांपासून सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही प्रणाली रडारवर अवलंबून नाही. त्याऐवजी प्रॉक्सिमिटी फ्यूजसह पॅसिव्ह इन्फ्रारेड डिटेक्शनचा वापर या प्रणालीत केला जातो. त्यामुळे ही प्रणाली घातक ठरत आहे.
या प्रणालीद्वारे रडार सिग्नल उत्सर्जित होत नाहीत. त्यामुळे लढाऊ विमानांना त्यातून सोडलेल्या क्षेपणास्त्रांचा शोध घेणे कठीण होत आहे. या प्रणालीतील क्षेपणास्त्राचा मारा ८ किमी अंतर आणि ६ किमी उंचीपर्यंत आहे. अमेरिकेची विमाने या पल्ल्यात असण्याची दाट शक्यता आहे.

माजिदची शोध क्षमता फार महत्त्वाची आहे. इन्फ्रारेड सेन्सर्सची रेंज १५ किमीपर्यंत आहे. तसेच काशेफ-९९ फेझ्ड-ॲरे प्रणालीचे कवच बाह्यभागाला असल्यामुळे माजिदची ट्रकिंग क्षमता आणखी ३० किलोमीटरपर्यंत वाढते. यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर देखरेख ठेवणेदेखील शक्य होते. माजिद प्रणालीमध्ये आठ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
माजिदची क्षेपणास्त्रे रडारऐवजी इन्फ्रारेडचा वापर करत असल्यामुळे विमानांच्या वॉर्निंग रिसिव्हर्सना त्यांचा माग काढणे कठीण जाते. यातूनच एफ-३५ सारख्या अत्यंत अत्याधुनिक विमानाला लक्ष्य केले गेले असावे, असे अनुमान काढले जात आहे. तसेच एफ-३५ मुळे प्रचंड उष्णता निर्माण होती, ही त्याची सर्वात मोठी कमकुवत बाजू असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून माजिद प्रणालीने अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक महागड्या यूएव्ही, जसे की एमक्यू-९ आणि हेरॉन ड्रोन्सना लक्ष्य केले आहे.
मोबाईल लाँचर्सकडे अधिक लक्ष
२०२५ मध्ये इराणचा इस्रायल आणि अमेरिकेविरोधात १२ दिवसांचा संघर्ष उडाला होता. या संघर्षानंतर इराणने हवाई सरंक्षण रणनीतीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले. भू-राजकीय विश्लेषक शाईल बेन-इफ्राइम यांच्या मते, इराणने बहुतेक हवाई संरक्षण प्रणाली आता भूमिगत क्षेपणास्त्र शहरांमध्ये, बोगद्यांत आणि खडबडीत किनारपट्टीच्या प्रदेशात लपवून ठेवल्या आहेत.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनुसार, अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या लष्करी लक्ष्यांना रोज लक्ष्य केले जात आहे. तरीही इराणचे निम्मे क्षेपणास्त्र प्रक्षेपक अजूनही शाबूत असल्याचे सांगितले जाते, असे वृत्त सीएनएनने दिले आहे. यापूर्वी इस्रायलने सुचविल्यानुसार इराणकडे अंदाजे २० ते २५ टक्केच क्षेपणास्त्र प्रक्षेपक शिल्लक आहेत.
मात्र इराणच्या गुप्त गुहांमध्ये आणि बोगद्यांमध्ये हजारो क्षेपणास्त्राविषयी दोन्ही राष्ट्र अद्याप अनभिज्ञ असल्याचे दिसते.
मारा आणि पळा
इराणने गेल्या काही काळात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या फिरत्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांमध्ये गुंतवणूक केली आहे. ही प्रक्षेपके मारा करून त्वरीत आपली जागा बदलू शकतात. त्यामुळे त्यांना शोधून, नष्ट करणे कठीण होते. मारा आणि पळा असे गनिमी काव्याचे डावपेच आखून हे प्रक्षेपक क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्वरित आपली जागा बदलते.
या वर्षाच्या सुरुवातीला रशियन सरकारच्या गुप्त कागदपत्रांनुसार, इराणने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रक्षेपक वाहन खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. वर्बा नावाच्या ५०० वाहनांच्या खरेदीचा हा करार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच बेन-इफ्रेम यांनी इस्रायली हवाई दलाच्या एका माजी कमांडरशी झालेल्या संभाषणाच्या आधारे त्यांनी दावा केला की, इराण चीनची अत्यंत प्रगत अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली वापरत आहे.
या प्रणालीमध्ये रडार आणि इन्फ्रारेड दोन्ही असल्यामुळे ती एफ-३५ सारख्या स्टेल्थ विमानांचा सामना करण्यास आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला प्रतिकार करण्यास अधिक सुसज्ज आहे.
