Iran USA Ground War preparations: अमेरिकेने मांडलेला १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने धुडकावून लावल्यानंतर उभय देशातील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार असल्याचे यापूर्वी त्यांनी जाहीर केल्याने आता इराण देखील संभाव्य भूयुद्धासाठी तयारी करत असल्याचे समोर आले आहे. संभाव्य भूयुद्धासाठी इराण दहा लाखांहून अधिक भूदल सैनिक सज्ज करत आहे. यासाठी मोठ्या संख्येने तरुण भरती केंद्रांवर गर्दी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
इराणने भूयुद्धासाठी सज्ज?
इराणमध्ये सैन्य संघटित झाले असून युद्धासाठी सज्ज आहे. बसिज, इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) आणि लष्कराद्वारे चालवल्या जाणाऱ्या भरती केंद्रांवर नागरिक गर्दी करत आहेत, असे वृत्त तेहरानच्या तसनीम या वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या विशेष ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे सैनिक येत्या काही दिवसांत मध्य-पूर्वेत दाखल होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर इराणने देखील भूयुद्धासाठी सज्ज असल्याचा एक प्रकारे इशाराच दिला आहे.
१५ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळला
इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधीसाठी चर्चा सुरु असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानकरवी १५ कलमी शांतता प्रस्ताव देखील इराणला पाठविण्यात आला पण, इराणने हा प्रस्ताव फेटाळला आहे. यानंतर पाच सुधारित अटी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेने आता इराणला परिस्थिती गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. इराणकडून आलेल्या महागड्या भेटीची माहिती देखील ट्रम्प यांनी दिली आहे.
महागडी भेट कोणती?
व्हाईट हाऊसमध्ये मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. वाटाघाटी व्यवस्थित सुरु असल्याची नमूद करताना ट्रम्प इराणकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. इराणने तेलाच्या १० बोट होर्मुझ सामुद्रधुनीतून सोडल्या, यात काही पाकिस्तानी जहाज देखील असल्याचे ट्रम्प म्हणाले. इराण शत्रूराष्ट्र अमेरिका आणि इस्रायल वगळता केवळ मित्रराष्ट्रांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देत आहे.
अमेरिकेकडे शस्त्रसाठा कमी?
चार आठवड्यांपासून इराणविरोधात युद्धात अडकलेल्या अमेरिकेचा शस्त्रसाठा देखील कमी होत चालला असल्याचे टेलिग्राफच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे लष्कराला जुने, अचूक वेध घेण्यास सक्षम नसणाऱ्या शस्त्रसाठ्यांचा वापर करावा लागू शकतो. समोर आलेल्या वृत्तानुसार, संघर्षाच्या पहिल्या १६ दिवसांत, अमेरिका च्या मित्र राष्ट्रांनी अंदाजे २६ अब्ज डॉलर्सच्या एकत्रित खर्चाने ११,००० दारुगोळा वापरल्याचे वृत्त आहे.
