Iran Attacks UAE with Drones and Missiles: पश्चिम आशियातील युद्ध गेल्या काही दिवसांपासून शांत होते. मात्र आखाती प्रदेशात पुन्हा एकदा युद्धज्वर चढला असून ४ मे च्या सायंकाळी इराणने संयुक्त अरब अमिरातीला (UAE) लक्ष्य केले. इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढविण्यात आल्याचे यूएईच्या यंत्रणेने सांगितले आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच ड्रोन हल्ल्यामुळे फुजैरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रात आग लागल्याची माहिती मिळत आहे.
इराणच्या ताज्या हल्ल्यामुळे महिनाभर पश्चिम आशियातील शांतता भंग झाल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर युद्धबंदीच्या कराराबाबत चर्चा सुरू होती. मात्र करारावर एकमत झाले नसल्याचे हल्ल्यांवरून दिसत आहे. इराणकडून झालेल्या हल्ल्यानंतर अमिरातीच्या हवाई संरक्षण दलाने काही हल्ले निकामी केले असल्याचा दावा केला आहे. मात्र तरीही ड्रोन धडकल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याचे मान्य केले.
फुजैरा माध्यम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फुजैरा ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणांकडून आग विझवण्याचे तात्काळ प्रयत्न सुरू झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अबु धाबीमधील भारतीय दूतावासाने एक्सवर यासंबंधी माहिती दिली आहे. “फुजैरामध्ये आज झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. जखमी भारतीय नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही स्थानिक यंत्रणेच्या संपर्कात आहोत”, अशी माहिती दूतावासाने पोस्टद्वारे दिली.

संयुक्त अरब अमिरातीने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून चार क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यापैकी हवाई संरक्षण यंत्रणेने तीन क्षेपणास्त्रे रोखली आहेत. तर चौथे क्षेपणास्त्र समुद्रात पाडण्यात आले. तसेच यूएईचे ऊर्जा निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या फुजैरा तेल उद्योग क्षेत्रात कोसळलेल्या ड्रोनमुळे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही यूएईमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
फुजैरा तेल उद्योग क्षेत्राला सामरिक महत्त्व आहे. या प्रकल्पामुळे यूएईला होर्मुझच्या सामुद्रधुनीला टाळून ओमानच्या आखातामार्गे तेल निर्यात करता येते. इराणच्या ताज्या हल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नांदत असलेली शांतता भंग होण्याची चिन्हे आहेत.
यूएईकडून मोबाइल अलर्ट जारी
संयुक्त अरब अमिरातीच्या सुरक्षा यंत्रणांनी दुबई आणि अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या शक्यतेचा इशारा देणारे मोबाइल अलर्ट जारी केले आहेत. “विद्यमान परिस्थिती आणि संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका पाहता नागिरकांनी तात्काळ जवळच्या सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. खिडक्या, दरवाजे आणि मोकळ्या जागांपासून दूर राहावे. पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी”, असे सतर्कतेचे संदेश मोबाइलवर पाठविले गेले आहेत.
