Iran Subsea Cable Threat: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु होऊन तीन आठवडे व्हायला आले आहेत. दोन्हीकडून चर्चा करण्यास नकार दिला जात असल्याने हा संघर्ष थांबण्याचे अद्याप कोणतेही चिन्ह दिसत नाही. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगाला होणाऱ्या इंधन आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तिसऱ्या आठवड्यात या संघर्षाने अधिक भीषण घेतले असून, गॅस आणि तेल साठ्यांना लक्ष केले जात आहे. अशात इराण होर्मुझमधऊन जाणाऱ्या केबल्स कापून जगाचा डिजिटल संपर्क तोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

होर्मुझ आणि रेड सीमधील बाब अल मंदेब मार्ग

होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक होते, याशिवाय डिजिटल नेटवर्कसाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. होर्मुझ आणि रेड सीमधील बाब अल मंदेब हे दोन्ही सागरी मार्ग डिजिटल रक्तवाहिन्या’ मानले जातात, कारण याच मार्गांवरून समुद्राखालून जाणाऱ्या फायबर-ऑप्टिक केबल्सचे जाळे पसरलेले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने समुद्री सुरुंग पेरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंज आहे. तर, लाल समुद्रातील बाब अल मंदेब मार्गवर इराण समर्थक हुथी बंडखोर हल्ला करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

१७ महत्वाच्या समुद्री केबल्स

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लाल समुद्रातून १७ महत्वाच्या समुद्री केबल्स जातात. या केबल्स आशिया आणि आफ्रिकेला इंटरनेटने जोडतात. त्याचप्रमाणे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या AAE-1, FALCON आणि टाटा-TGN गल्फ सारख्या केबल्स भारताच्या परदेशातील डेटा कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.​

बड्या कंपन्यांना मोठा फटका

ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या बड्या कंपन्यांनी संयुक्त अरब (UAE) आणि सौदी अरेबियामध्ये डेटा सेंटर्स उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हे क्षेत्र ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे (AI) केंद्र बनवण्याची त्यांची योजना आहे. मात्र, सध्याच्या युद्धामुळे या केबल्सची दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. लष्करी हालचालींमुळे दुरुस्ती करणारी जहाजे या भागात जाण्यास तयार नाहीत.

​भारतावर काय परिणाम होणार?

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, जर समुद्रातील या केबल्सना हानी पोहोचली, तर त्याचा फटका केवळ फोन किंवा वेबसाइट्स यांनाच नव्हे, तर बँकिंग, शेअर बाजार, रुग्णालयांना बसू शकतो. तसेच AI यंत्रणाही ठप्प होऊ शकतात. गल्फ देशांना याचा पहिला फटका बसेल, पण भारतालाही मोठ्या प्रमाणात इंटरनेट स्लोडाउनचा सामना करावा लागू शकतो. कारण भारताचे अनेक आंतरराष्ट्रीय डेटा कनेक्शन याच मार्गांवर अवलंबून आहेत, अशी माहिती आहे. 

तज्ज्ञांची भीती

दोन्ही ठिकाणी हानी पोहोचवल्यास जगाला मोठा फटका बसू शकतो, असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. सध्या इंटरनेट सेवा सुरु असली तरी सततचे हल्ले विचारात घेता डिजिटल कनेक्टिव्हिटीला अधिक धोका वाढला असल्याचे सांगितले जात आहे.