Iran Isreal US War, US Aircraft Loss : इराणमध्ये अमेरिकेने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला लवकरच तीन महिने पूर्ण होतील. पण इराण शरण आलेला नाहीच, आणि अमेरिकेची लष्करी कारवाई सध्या केवळ स्थगित आहे. पण या कारवाईत अमेरिकेने आतापर्यंत ४२ निरनिराळी विमाने गमावली, ज्यांतली काही अत्यंत महागडी होती. याशिवाय आतापर्यंत या कारवाईत अमेरिकेच्या २९०० कोटी डॉलरचा चुराडा झाल्याची धक्कादायक कबुली अमेरिकी काँग्रेसच्या अहवालातच नमूद आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस कारवाईला सुरुवात झाली. मोठ्या नरसंहारानंतर, वित्तहानीनंतर एप्रिलच्या सुरुवातीस तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली. मात्र युद्ध संपलेले नाही आणि अमेरिका व इराण आपापल्या अटींवर आजही अडून बसले आहेत. अमेरिकेच्या कारवायांना पायबंद बसावा यासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर, तसेच इस्रायलवर हल्ले चढवले. यामुळे जागतिक खनिज तेल व्यापार प्रचंड प्रमाणात विस्कळीत झाला आणि बहुतेक सर्व देशांना याचा फटका आज बसत आहे. इराणमध्ये अमेरिकेचे सैनिक उतरवून कारवाई पूर्णत्वास नेण्याची इच्छा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली होती. पण इराणचा तिखट प्रतिकार पाहून ट्रम्प प्रशासनाने तूर्त ते दुःसाहस लांबणीवर टाकलेले आहे.
अमेरिकी काँग्रेसचा अहवाल
अमेरिकी कायदेमंडळ अर्थात काँग्रेसच्या काँग्रेशनल रिसर्च सर्विस (सीआरएस) विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, एफ-३५ हे अत्याधुनिक लढाऊ विमान, एफ-१५ स्ट्राइक ईगल, एमक्यू-नाइन रीपर ड्रोन्स, केसी-१३५ टँकर अशी विविध प्रकारची सुमारे ४२ विमाने इराणच्या प्रतिहल्ल्यांमध्ये नष्ट किंवा पूर्णतया नादुरुस्त झाली. विशेष म्हणजे गतवर्षी जूनमध्ये झालेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर आणि यंदाच्या कारवाईनंतरही इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा, तसेच हवाईदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दावे अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार झाले. त्यात काही अंशी तथ्य असले, तरी इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या प्रहार क्षमतेला कमी लेखण्याची चूक अमेरिका आणि इस्रायलकडून झाली आणि त्याची मोठी किंमत विशेषतः अमेरिकेला चुकवावी लागली हे उघड आहे.
कारण इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने आखाती देशांतील आपल्या विविध तळांचा वापर केला. पण सौदी अरेबिया, इराक, कुवेत, यूएई, कतार, बहारिन, ओमान अशा अनेक देशांतील अमेरिकेच्या तळांवर इराणने हल्ले केले. कुवेतमध्ये तेथील हवाईदलाने ‘नजरचुकी’ने अमेरिकेचीली तीन एफ-१५ ही लढाऊ विमाने पाडली. सौदी अरेबियातील तळावर झालेल्या इराणी हल्ल्यांमुळे काही प्रमाणात केसी-१३५ ही अमेरिकेची इंधन पूरक विमाने नष्ट झाली. यातही इराणच्या सीमेत आलेले एफ-३५ हे अत्याधुनिक ‘फिफ्थ-जनरेशन’ लढाऊ विमान इराणने पाडल्यामुळे खळबळ उडाली. रडारला चकवा देऊ शकणाऱ्या, स्टेल्थ प्रकारातील हे लढाऊ विमान पाडण्याची क्षमता इराणकडे नाही अशी अमेरिकेची ठाम समजूत होती.
सर्वाधिक नुकसान अमेरिकेच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या रीपर ड्रोन्सचे झाले. असे जवळपास २४ ड्रोन्स इराणने नष्ट केले. अमेरिकेचे प्रत्येक विमान वा ड्रोन हे दूरसंपर्क प्रणाली, रडार यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असते. या प्रत्येक यंत्रणेवर प्रचंड खर्च करावा लागतो. त्यामुळे एखादे विमान किंवा ड्रोन नष्ट होणे वा नादुरुस्त होणे ही बाब अमेरिकेसाठी प्रचंड खर्चिक ठरते. इराणला अमेरिकेच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना होती. या लष्करी ताकदीला थेट भिडणे शक्य नाही, पण असमतुल्य लढाई (asymmetric warfare) या डावपेचाचा वापर करून इराण केवळ टिकून राहिला असे नव्हे, तर अमेरिकेला आणि तिच्या मित्रदेशांना बेजारही करत राहिला.
अमेरिकेत तीव्र पडसाद
काँग्रेसच्या अहवालाचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटू लागले आहेत. या कारवाईत आतापर्यंत १३ अमेरिकी सैनिक मृत्युमुखी पडले यावरून तेथील जनमत प्रक्षुब्ध होते. पण ‘इराणला संपवले’, ‘इराणला लोळवले’, ‘इराणला चुटकीसरशी शरण आणले’ छापाच्या ट्रम्प वल्गना किती हास्यास्पद आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत याची जाणीव अमेरिकी जनतेला होऊ लागली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकी युद्धसामग्री कामी येण्याचे प्रसंग फारसे आलेलेच नाहीत. कोणतीही लष्करी कारवाई ६० दिवसांच्या पेक्षा अधिक काळ चालवायची असेल, तर अमेरिकेत कोणत्याही प्रशासनाला त्यासाठी काँग्रेसची मंजुरी घ्यावी लागते असा संकेत आहे.
ट्रम्प प्रशासनाने यात चलाखी करून ही कारवाई ६० दिवस पूर्ण होण्याआधीच युद्धविरामाच्या माध्यमातून स्थगित केली. कदाचित काही दिवसांनी पुन्हा कारवाई करण्याची वेळ आलीच तर तिला नवीन कारवाई संबोधता यावे यासाठीही युद्धविराम घोषित करण्यात आल्याचे ट्रम्प विरोधकांचे म्हणणे आहे. युद्धामध्ये अमेरिकेची हानी किती झाली याविषयीचे आकडे ट्रम्प प्रशासन दडवत असल्याची त्यांच्या काही समर्थकांचीही भावना आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये फटका बसू नये यासाठी इराणवरील कारवाईबाबत अवास्तव विजयी दावे करण्याचा सपाटा ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. पण इराणने होर्मुझवरील पकड ढिली केलेली नाही आणि अण्वस्त्र कार्यक्रम पूर्ण गुंडाळण्याबाबत ठोस आश्वासनही दिलेले नाही. त्यामुळे नव्याने कारवाई करायची तर नव्याने युद्धसामग्री आणि मनुष्यहानीला सामोरे जावे लागेल. तसे करावे का, याविषयी ट्रम्प प्रशासनाची द्विधा मनस्थिती आहे.
इराण पुन्हा शस्त्रसज्ज?
अमेरिकी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासारख्या ट्रम्प यांच्या काही युद्धखोर मंत्र्यांना मात्र अमेरिकेने कारवाई पुन्हा सुरू करावी असे वाटते. अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. इराण शरण येईपर्यंत त्यांचा वापर करत राहावा, असे हेगसेथ आणि मंडळींना वाटते. मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे उत्पादन नव्याने सुरू केले आहे. त्यामुळे अमेरिकेचे हल्ले सुरू झाल्यास इराणचे प्रतिहल्ले सुरू होतील. होर्मुझची नाकेबंदी उठवण्याचा मुद्दा अनुत्तरित राहील आणि त्याच्या झळा जागतिक अर्थव्यवस्थेला बसत राहतील. शिवाय इराणने आता चीनकडून अद्ययावत रडार यंत्रणा हस्तगत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्या देशाच्या हवाई हद्दीचा वापर सहजासहजी करता येणार नाही, असा इशारा अमेरिकेतीलच लष्करी अधिकारी आणि विश्लेषकांनी दिला आहे.
दुसरीकडे, अमेरिकेच्या नुकसानीचे आकडे प्रसृत झाल्यामुळे इराणमध्ये जल्लोष सुरू असून, युद्धात आपण जिंकलो असा प्रचार तेथे सरकारी पातळीवरून सुरू झाला आहे. खुद्द इराणची हानी अपरिमित आहे. त्यांच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाती एक अख्खी फळी कापली गेली आहे. पण माफक यशालाच विजय मानून घेण्याची खोड त्यांच्यातही मुरलेली आहे. या दोन युद्धखोर मानसिकतेच्या देशांमध्ये फारतर शस्त्रसंधी किंवा युद्धविराम घडून येऊ शकतो. मात्र युद्धसमाप्तीची शक्यता धूसरच राहते.
