US President Donald Trump claims the Iran war is very close to over : आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडत असून इराण-अमेरिका युद्ध कधी थांबणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला असून त्याची मुदत येत्या आठवड्याभरता संपणार आहे. त्यामुळे, पुन्हा पूर्वीप्रमाणे विध्वंस पाहायला मिळणार की यावर कायमचा तोडगा निघणार हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे. दरम्यान, हे युद्ध जवळपास संपत आलंय अशी, आशादायी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय. ते फॉक्स न्युजबरोबर बोलत होते.
फॉक्स बिझनेस नेटवर्कच्या “मॉर्निंग्स विथ मारिया” (Mornings with Maria) या कार्यक्रमासाठी दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की हे युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे, माझ्या मते ते संपण्याच्या अगदी मार्गावर आहे.”
इराणला तडजोड करायची आहे
ते पुढे म्हणाले, “जर मी आत्ता माघार घेतली (किंवा कारवाई थांबवली), तरी त्यांना तो देश पुन्हा उभा करण्यासाठी २० वर्षे लागतील. आणि अजून आमचे काम संपलेले नाही. बघूया काय होते ते. मला वाटते की त्यांना आता तडजोड किंवा करार करण्याची तीव्र इच्छा आहे.”
युद्ध सुरू झाल्यापासून काही दिवसांतच ट्रम्प यांनी वारंवार अमेरिकेच्या विजयाची घोषणा केली आहे. मात्र, जमिनीवरील वास्तविक परिस्थिती यापेक्षा कितीतरी पटीने गुंतागुंतीची राहिली आहे. तर, इस्लामाबाद येथे १० एप्रिल रोजी झालेली शांतता बैठकही अनिर्णित राहिली. त्यामुळे जागतिक पातळीवरीह हे युद्धांचं सावट कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, इस्लामाबाद येथे पुन्हा एकदा चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. या चर्चेकरता अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर युद्धबंदीची घोषणेकडे जगभरातील नेत्यांचं लक्ष आहे.
मोदी -ट्रम्प यांचा फोनवर संवाद
मोदी आणि ट्रम्प यांच्या मध्यपूर्वेतील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीसह इतर महत्वांच्या विषयांवर सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. दूरध्वनीवरील या संभाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी “आम्हा सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे,” असा विशेष संदेश मोदींना दिला, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटले पीटीआयशी बोलताना सांगितले.
