Crude Oil Price Iran Israel War Impact: मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतात एलपीजीचा तुटवडा भासत असून दोन दिवसांपासून देशातील अनेक प्रमुख शहरातील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक थांबली आहे. त्यातच आता इराणने एक मोठा इशारा दिला आहे. ज्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतात, असे इराणने सांगितले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगाला कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबली आहे. युद्धाच्या १३ व्या दिवशीही इराणने मध्य पूर्वेतील देशांमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा सुरू ठेवला आहे.

इराणच्या लष्करी कमांडने म्हटले की, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची तयारी जगाने ठेवावी. “कच्च्या तेलाची किंमती प्रती बॅलर २०० डॉलरपर्यंत जाण्याची तयारी ठेवावी. कारण तेलाच्या किमती प्रादेशिक सुरक्षेवर अवलंबून आहे. जी तुम्ही अस्थिर केली आहे”, अशी प्रतिक्रिया इराणचे लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाकारी यांनी अमेरिकेला दिला.

इब्राहिम झोल्फाकारी पुढे असेही म्हणाले की, इराण मर्यादीत हल्ल्यानंतर आता इस्रायल आणि अमेरिकेवरील हल्ल्याचे प्रमाण वाढवणार आहे. वरिष्ठ लष्करी प्रवक्ते अबोलफझल शेखरची यांनी इराणच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणची बंदरे आणि गोदीला लक्ष्य केल्यास आम्हीही या प्रदेशातील इतर बंदरे आणि गोदींवर हल्ला करू. आमचा हल्ला कायदेशीर असेल.

या आठवड्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅलर १२० डॉलर्सपेक्षाही अधिक वाढल्या होत्या. मात्र नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात आता काही उरले नसल्याचे विधान केल्यानंतर तेलाच्या किंमती स्थिर झाल्या होत्या. तर भारतातील शेअर बाजारासह जगभरातील बाजारात सकारात्मक चित्र दिसले होते. मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीत दीर्घकाळ संघर्ष टिकून राहिल्यास पुन्हा एकदा जगावर भयंकर संकट उभे राहू शकते.

इराणची १६ जहाजे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा

मध्य पूर्व युद्धामुळे जवळपास बंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराण खाणकाम करत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने इराणवर जबरदस्त हल्ला केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या १६ इराणी जहाजांना नष्ट केल्याचा दावा, अमेरिकेने केला आहे. यामुळे या प्रदेशातील सुरक्षेचा प्रश्न आणखी उग्र बनला आहे.