US Iran war : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. याचं कारण म्हणजे युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा पार पडली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. २१ तास चाललेली ही चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान, ही चर्चा निष्फळ ठरताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला पुन्हा एकदा इशारा देत होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिले आहेत.

यातच दुसरीकडे इराणनेही होर्मुझ सामुद्रधुनीतील एक व्हिडीओ शेअर करत अमेरिकेला इशारा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील एक व्हिडीओ शेअर करत अमेरिकेच्या युद्धनौकेला दूर राहण्याचा इशारा दिला. ‘जर तुम्ही आदेशाचं पालन केलं नाही, तर तुम्हाला लक्ष्य केलं जाईल’, असं इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांना म्हटलं आहे.

दरम्यान, इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी रविवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार हा व्हिडीओ आदल्या दिवसाचं असून त्यामध्ये त्यांचं नौदल अमेरिकेच्या एका युद्धनौकेला इशारा देऊन होर्मुझ सामुद्रधुनीपासून दूर राहण्यास भाग पाडत असल्याचं दिसत आहे. इराणी दूतावासांनी हा व्हिडीओ एक्स हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडीओबाबत अमेरिकेने अद्याप काही पुष्टी केलेली नाही. पण इराणी वृत्तसंस्थांनी शेअर केलेल्या ६४ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समधील एक व्यक्ती असं बोलताना ऐकू येत आहे की, “यूएस नेव्ही वॉरशिप तुम्ही तुमचा मार्ग बदलून ताबडतोब हिंद महासागरात परत जा. जर तुम्ही आमच्या आदेशाचं पालन केलं नाही, तर आम्हाला तुम्हाला लक्ष्य करावं लागेल, हा अंतिम इशारा.”

शांतता चर्चा फिस्कटताच ट्रम्प यांची घोषणा, होर्मुझच्या नाकेबंदीचे आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा देत थेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं की, “होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल. मी जगातील सर्वोत्तम असलेल्या अमेरिकेच्या नौदलाला, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतंही शुल्क दिलेल्या कोणत्याही जहाजाचा शोध घेऊन त्याला अडवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा जहाजांना खुल्या समुद्रातून सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. तात्काळ प्रभावाने ही प्रक्रिया सुरू केली जाईल”, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकेने शांतता चर्चेबाबत काय म्हटलं?

जे.डी.व्हान्स यांनी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना बाजू मांडली. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे कोणताही करार होऊ शकला नाही, असं त्यांनी सांगितलं. जे.डी.व्हान्स म्हणाले, “आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिली होती आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती. जे.डी.व्हान्स यांच्या मते मुख्य मुद्दा इराणच्या अणू कार्यक्रमाचाच आहे. तेहरान अण्वस्त्रे बनवणार नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धता द्यावी, अशी वॉशिंग्टनची मागणी आहे. “आम्हाला त्यांच्याकडून केवळ आत्तासाठीच नव्हे तर दीर्घकाळासाठी एक सकारात्मक वचन हवं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.