Iran warns Us Donald Trump over military action says will treat any attack as all-out war : इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना इशारा दिला आहे. तेहरानवर झालेला कोणताही हल्ला हा ‘आमच्या विरोधातील निर्णायक युद्ध’ मानले जाईल असे इराणने म्हटले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या युद्धनौकांचा ‘मोठा ताफा’ इराणकडे कूच करत असल्याचे विधान केल्यानंतर दुसर्याच दिवशी हा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अमेरिकेच्या सततच्या लष्करी धोक्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अयातुल्ला खामेनी यांची राजवट त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करेल असे त्यांनी सांगितले.
“यावेळी, आम्ही कोणताही हल्ला – मर्यादित, अमर्यादित, सर्जिकल, कायनेटीक, ते याला काहीही म्हणोत – आमच्या विरोधात पुकारलेले निर्णायक युद्ध असेच मानू, आणि हे संपवण्यासाठी शक्य तेवढ्या कठोरपणे त्याला प्रत्युत्तर देऊ,” असे इराण सरकारच्या अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले.
ट्रम्प यांनी अमेरिकन युद्धनौकांचा एक मोठा ताफा इराणच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितल्यानंतर इराणने हा इशारा दिला आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. यादरम्यान आंदोलकांच्या हत्या केल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली होती. मात्र नंतर ट्रम्प यांनी यापासून माघार घेतल्याचे दिसून आले होते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इराणमधील खामेनी राजवटीविरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनांमध्ये आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
इराण-अमेरिकेत तणाव
विमानवाहू युद्धनौका अब्राहम लिंकन आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज तीन डिस्ट्रॉयर युद्धनौका मध्य पूर्वेकडे जात आहेत, असे वृत्त एनवायटीने दिले आहे. तसेच अमेरिकेच्या हवाई दलाने देखील डझनभर F-15E फायटर जेट्स या भागात पाठवले आहेत.
इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले की तेहरान हाय अलर्टवर आहे, मात्र असे असले तरी इराणकडून दिले जाणारे प्रत्युत्तर कोणत्या स्वरुपाचे असेल याबद्दल मात्र त्यांनी फारशी माहिती दिली नाही.
“ही सैन्याची वाढलेली तैनाती, आम्हाला आशा आहे की प्रत्यक्ष संघर्षासाठी नसावी. पण आमचे लष्कर कोणत्याही वाईटात वाईट प्रसंगासाठी तयार आहे. याच कारणामुळे इराणमध्ये सर्वकाही हाय अलर्टवर आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
“अमेरिकेच्या सततच्या लष्करी धोक्याखाली असलेल्या एका देशाकडे इराणवर हल्ला करण्याचे धाडस दाखवेल त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पुन्हा समतोल निर्माण करण्यासाठी आपल्याकडील सर्वकाही वापरणे, याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
