उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेमुला प्रकरणातुन लोकांची दिशाभूल करण्यासाठी स्मृती इराणींना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पदावरुन हटविण्यात आले आहे. असा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केला आहे. स्मृती इराणी मनुष्यबळ विकास मंत्री पदावर असताना हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित वेमुलाने आत्महत्या केली होती. मंत्री मंडळातील हा फेरबदल समाधान कारक असला, तरी हा निर्णय वेमुला प्रकरणाला न्याय देणारा नाही, असे कन्हैयाने म्हटले आहे. काल केंद्रीय मंत्री मंडळातील विस्तारानंतर स्मृती इराणींना मनुष्यबळ विकास खात्यावरुन पाय उतार करत त्यांच्याकडे कमी महत्त्वाचे वस्त्रोद्योग खाते सोपविण्यात आले. दरम्यान,  इराणी यांनी नवीन मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असून आपली जागा घेणाऱ्या प्रकाश जावडेकरांना देखील त्यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्ली विद्यापीठातील देशविरोधी घोषणाबाजी नंतर जामिनावर सुटका झालेल्या कन्हैया कुमारने अफजल गुरु नव्हे, तर रोहित वेमुला आपला आदर्श असल्याचे सांगत रोहित वुमुला आत्महत्या प्रकरणात उडी घेतली होती. रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने स्मृतींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या दोन वर्षाच्या कालावधीत रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणामध्ये स्मृती इराणींवर जोरदार टीका झाली होती.