US-Iran Conflict : इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याने संपूर्ण मध्य पूर्वेतील स्थिती अस्थिर झाली आहे. यादरम्यान इराणच्या एका प्रतिनिधीने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. भारत, चीन आणि रशिया असा देशांनी प्रगती करून शक्तीशाली बनू नये यासाठी अमेरिकेने हे युद्ध भडकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इराणच्या सर्वोच्च नेत्याचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही हे एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “तेच (अमेरिका) आमच्यावर हल्ले करत आहेत आणि आमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकत आहेत, आम्ही फक्त स्वतःचा बचाव करत आहोत. इराणने हे युद्ध सुरू केलेले नाही… आता या क्षणी हे युद्ध थांबावे अशी आम्ही आशा करतो. पण हे आमच्या हातात नाही. हे अमेरिका आणि झायोनिस्ट राजवटीच्या हातात आहे. त्यांनी सुरुवात केली आहे, त्यांनीच ते थांबवायला हवे…”

इलाही यांनी जरी असा दावा केला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याच्या उलट भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला इराणविरोधातील युद्धात इस्रायलने वळवल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्याऐवजी इराण हा पहिल्यांदा हल्ला करण्याच्या तयारीत होता आणि त्यामुळे अमेरिकेने या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आधी पावले उचलली असे म्हटले आहे.

इलाही यांनी असाही आरोप केला की, भारत, चीन आणि रशिया यासारखे शक्तीशाली देश उभे राहू नयेत म्हणून अमेरिका संघर्ष निर्माण करत आहे. ते असेही म्हणाले की अमेरिकेला स्वतःचे वर्चस्व कायम राखायचे आहे आणि त्यांना कोणताही भागीदार, विशेषतः शक्तिशाली देश नको आहे.

“अमेरिकेचे लक्ष्य हे इराण नाही, तर इराणनंतर ते इतर देशांकडे वळतील. तपासानुसार, भविष्यात… भारत, चीन रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असतील. त्यामुळे अमेरिकेला कोणीही भागीदार नको आहे. भारत किंवा चीनने एक शक्तिशाली सहकारी म्हणून पुढे यावे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे, हा बदल होऊ नये आणि त्यांचे जागतिक वर्चस्व कायम राहावे यासाठी ते युद्ध भडकवत आहेत,” असे इलाही म्हणाले.