US Isreal Iran War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झालेला आहे. या तणावामुळे अनेक देशांना होणारा कच्च्या तेलचा पुरवठा विस्कळीत होत आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतही तणावाची परिस्थिती असल्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
अशी परिस्थिती असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे विधाने करत इराणला धमकी देत आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. मात्र, असं असतानाच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य करत हे युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी इराणच्या सरकारी मीडियाशी बोलताना म्हटलं की, “हे युद्ध पूर्णपणे थांबवण्याच्या कोणत्याही पुढाकाराचं इराण स्वागत करतो.” दरम्यान, परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध अखेर थांबणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
चीनकडे मदत मागितल्यामुळे इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ‘होर्मुझच्या सामुध्रुनी’तून (Strait of Hormuz) होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी इतर राष्ट्रांना मदतीचे आवाहन केले. मात्र, इराणने या विनंतीची खिल्ली उडवली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकेचे सुरक्षा कवच “छिद्रांनी भरलेले” (कुचकामी) आहे. त्यांनी असा दावाही केला की, होर्मुझ सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनसारख्या देशांकडे “याचना” करत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेला हा भाग आता वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
“अमेरिकेचे तथाकथित सुरक्षा कवच कुचकामी ठरले असून ते संकटांना रोखण्याऐवजी निमंत्रण देत आहे. अमेरिका आता होर्मुझ सुरक्षित करण्यासाठी इतरांकडे, अगदी चीनकडेही मदत मागत आहे. इराण आपल्या शेजारी राष्ट्रांना आवाहन करतो की, त्यांनी विदेशी आक्रमकांना हाकलून लावावे, कारण त्यांचा एकमेव हेतू इस्रायलचे रक्षण करणे हाच आहे,” असे अराघची यांनी नमूद केले.
