Iran US War Update : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला आता जवळपास एक महिना लोटला, तरी या युद्धाबाबत अद्याप स्पष्ट तोडगा निघालेला नाही. सध्या अमेरिकेने पाकिस्तानच्या मध्यस्थीने युद्धबंदीची चर्चा सुरू केली असली तरी इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. मात्र, एकीकडे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू असताना दुसरीकडे अमेरिका इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा इराण करत आहे.
या पार्श्वभूमीवरून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. ‘डोनाल्ट ट्रम्प यांनी जर इराणवर जमिनीवरील कारवाईचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचे सैनिक पर्शियन आखातातील शार्क माशांचे खाद्य बनतील’, असा इशारा इराणी सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.
इराण सशस्त्र दलाने काय म्हटलं?
“एपस्टीन प्रकरणामुळे ‘मोसाद’च्या दबावाखाली असलेले डोनाल्ट ट्रम्प हे इस्रायली पंतप्रधानांचे प्यादे बनले आहेत”, अशी टीका इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रवक्त्यांनी केली. तसेच “जर डोनाल्ट ट्रम्प यांनी जमिनीवरील कारवाईचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचे सैनिक पर्शियन आखातातील शार्क माशांचे खाद्य बनतील”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
'Trump a PAWN of Israeli PM, under pressure from Mossad due to his background in EPSTEIN case' — Iran Armed Forces Spox
— RT (@RT_com) March 29, 2026
If Trump attempts ground op, 'US soldiers will become good food for SHARKS of Persian Gulf' pic.twitter.com/dmA22R5Ali
‘अमेरिकेची गुप्तपणे जमिनीवरील हल्ल्याची योजना’, इराणचा दावा
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी अमेरिकेबाबत मोठा दावा केला. मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं की,”इराणचे सशस्त्र दल अमेरिकेच्या संभाव्य जमिनीवरील आक्रमणासाठी सज्ज आहेत. अमेरिकेच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा त्यांनी दिला.
मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं की, कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला इराण जोरदार प्रत्युत्तर देईल. अमेरिका जाहीरपणे वाटाघाटींची भाषा करत असताना दुसरीकडे गुप्तपणे जमिनीवरील हल्ल्याची योजना आखत आहे. शत्रू एकीकडे वाटाघाटींबाबत बोलत आहे आणि दुसरीकडे जमिनीवरील आक्रमणाची योजना आखत आहे. अमेरिका १५-कलमी शांतता प्रस्तावाच्या माध्यमातूनही हेच करू पाहत आहे. कारण ते युद्धात जिंकू शकले नाहीत. पण आता आमचंही सैन्य सज्ज आहे आणि आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही’, असं मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं आहे.
इराण-अमेरिका संघर्ष टोकाला! ३,५०० अमेरिकन सैनिक तैनात
मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या प्रदेशात ३,५०० हून अधिक अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये २,५०० मरीन सैनिकांसह सज्ज असलेले ‘युएसएस त्रिपोली’ (USS Tripoli) हे आधुनिक जहाज आता युद्धक्षेत्रात दाखल झाले आहे.
