BRICS Summit 2026 : अमेरिका-इराणमधील संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचे ढग कायम आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत देखील तणाव असल्यामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अमेरिका-इराणमधील हे युद्ध कधी थांबेल? या संघर्षावर ठोस तोडगा कधी निघेल? याबाबत संभ्रम कायम आहे.
अमेरिका-इराण युद्धात आतापर्यंत इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणमधील काही दिग्गज नेत्यांसह प्रमुख लष्करी अधिकारी आणि शेकडो नागरिकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करत इराणला धमकी देत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यानच आता इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मसूद पेझेश्कियान हे सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीला येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान मसूद पेझेश्कियान आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मसूद पेझेश्कियान यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
मसूद पेझेश्कियान यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण भारत २०२६ मधील १८ व्या ब्रिक्स परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. भारताने २०२६ च्या सुरुवातीला ब्राझीलकडून ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. तसेच ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कझान या ठिकाणी झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पेझेश्कियान यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा या दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली होती.
जूनच्या सुरुवातीला ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची भारतात आले होते. तेव्हा झालेल्या बैठकीनंतर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अराघची यांनी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित केला होता. तसेच पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी भारतही मोठी भूमिका बजावू शकतो असं म्हटलं होतं.
दरम्यान, सध्याच्या संकटावर कोणताही लष्करी उपाय नाही आणि वाटाघाटींद्वारे तोडगा काढणं हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे, असं अराघची यांनी म्हटलं होतं. होर्मुझ सामुद्रधुनीच्या भागात सुरक्षेचे रक्षक म्हणून आपलं ऐतिहासिक कर्तव्य इराण सदैव पार पाडेल, असंही अराघची यांनी स्पष्ट केलं होतं.
