Ayatollah Ali Khamenei warns Israel: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी शनिवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक आणि लष्करी तळांना लक्ष्य केले होते. त्यानंतर इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यानंतर खामेनी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून इस्रायल आणि झायोनिस्ट राजवटीचा अंत जवळ आल्याचा इशारा दिला.
इराणचे सैन्य प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे, असे सांगताना खामेनी म्हणाले की, त्यांनी (इस्रायल) हल्ला केला आणि सर्व संपले असे समजू नका. उलट त्यांनीच पहिला हल्ला केला आणि संघर्षाची सुरुवात केली.
खामेनी यांच्या एक्स हँडलवरून त्यांचे सविस्तर निवेदन असलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. झियोनिस्ट राजवटीने सर्वात मोठी चूक केली असून ती अतिशय गंभीर आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे आता इस्रायली राजवटीचा विनाश जवळ आला आहे, असे खामेनी यावेळी म्हणाले.
झायोनिस्ट राजवटीने मोठी चूक केली. ईश्वराच्या कृपेने आता त्यांची राजवट उध्वस्त होईल. इराणी राष्ट्र आपल्या शहीदांचे रक्त सूड घेतल्याशिवाय वाया जाऊ देणार नाही. तसेच इराणच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाकडेही दुर्लक्ष करणार नाही. आमचे सशस्त्र दल तयार आहे. देशातील लोक सशस्त्र दलांच्या मागे आहेत, असेही खामेनी यावेळी म्हणाले.
शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत.
इराणच्या अणू कार्यक्रमाला अमेरिका, इस्रायलचा विरोध
इराणने अणू कार्यक्रम पुढे नेण्याची कटिबद्धता वारंवार दर्शविल्यानंतर आणि या बाबतीत अमेरिकेच्या आवाहनालाही धुडकावून लावल्यानंतर इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले. इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’मध्ये इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणने या हल्ल्याला ड्रोन हल्ल्याने तातडीने प्रत्युत्तर दिले आहे.
इराणकडून संभाव्य अणुबॉम्बचा धोका टाळण्यासाठी हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणवर केलेल्या हल्ल्यात दोनशेहून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. सुमारे शंभर लक्ष्यांवर हा हल्ला करण्यात आला.