अमेरिकेत घडलेल्या घटनेत अरबी भाषेतून संवाद साधल्यामुळे एका २६ वर्षीय मुसलमान विद्यार्थ्यास ‘साउथवेस्ट एअरलाइन्स’च्या विमानातून खाली उतरविण्यात आले. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात शिकत असलेला खैरुलदीन मखजुमी नावाचा हा मुसलमान विद्यार्थी अमेरिकेत इराकी शरणार्थी असून, विमानातील एका अन्य प्रवाशाने त्यास अरबी भाषेत संवाद साधताना ऐकल्यानंतर त्याला विमानातून खाली उतरविण्यात आले. मखजुमीला लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑकलंण्डला नेण्यात आले.
विमान उडण्यापूर्वी त्याने बगदादमधील आपल्या काकांना फोन लावला. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांचा समावेश असलेल्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. बगदादमधील आपल्या काकांना याबाबात माहिती देण्यासाठी विमानातून त्याने काकांना फोन लावला होता. कार्यक्रमात आपण कशाप्रकारे महासचिवांना इस्लामिक स्टेटबाबत प्रश्न विचारला ते मखजुमीने उत्साहात काकांना सांगितले. ‘इन्शाल्ला’ उद्गारून त्याने काकांबरोबरच्या संभाषणाचा समारोप केला.
मखजुमीच्या बाजूला बसलेल्या महिला प्रवाशाने त्याचे फोनवरील संभाषण ऐकले आणि तिला धोका जाणवल्याचे एअरलाईनने जाहीर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे. मखजुमीच्या शेजारची आपली सीट सोडून ती महिला विमानाच्या पुढील भागात बसायला गेली. काही वेळाने अरबी भाषा बोलणारा एक कर्मचारी मखजुमीच्या सीटजवळ आला आणि त्याला विमानाच्या बाहेर घेऊन गेला. नंतर एफबीआयचे तीन अधिकारी मखजुमीला चौकशीसाठी घेऊन गेले. मखजुमीने ‘शहिद’ शब्द उच्चारल्याचे आपण ऐकले असल्याचे त्या महिला प्रवाशीने विमान कंपनीच्या कर्माचाऱ्याना सांगितले. हा शब्द जिहादशी जोडला जातो. मुसलमान असल्यामुळे विमानातून बाहेर काढण्याच्या या वर्षी आत्तापर्यंत कमीतकमी सहा घटना घडल्याचे कौन्सिल ऑफ अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सच्या सॅन फ्रान्सिस्को बे एरिया कार्यालयाच्या कार्यकारी संचालक जहरा बिल्लू यांनी माहिती दिली.

Story img Loader