IRCTC New Website Train Ticket Booking Online Step by Step Guide: भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि डिजिटल अनुभव अधिक सोपा करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आपल्या तिकीट बुकिंग पोर्टलची नवीन ‘बीटा’ (Beta) आवृत्ती अधिकृतपणे लाँच केली आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना अत्यंत वेगाने, सोप्या पद्धतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट बुक करता यावं, याच उद्देशाने या नवीन वेबसाईटची रचना करण्यात आली आहे.
सन २००२ मध्ये सुरू झालेल्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आजघडीला दररोज सरासरी १४.५ लाख ट्रेन तिकिटांचे बुकिंग केले जाते. यामुळेच ही देशातील सर्वाधिक व्यस्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सपैकी एक मानली जाते. आता या नवीन वेबसाईटमुळं प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
नवीन वेबसाईटची लिंक
आयआरसीटीसीच्या या नवीन अपडेटेड वेबसाईटचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही थेट https://www.irctc.co.in/eticket/ या लिंकला भेट देऊ शकता. याशिवाय, आयआरसीटीसीच्या सध्याच्या जुन्या वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन ‘NEW’ या पर्यायावर क्लिक करूनही तुम्ही या नवीन पोर्टलवर पोहोचू शकता.

नवीन वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट कसं बुक करायचं?
नवीन वेबसाईटवरून तिकीट बुक करणे आता पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. खालील पाच सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे तिकीट मिनिटांत बुक करू शकता….

१. लॉग-इन करा
सर्वप्रथम नवीन आयआरसीटीसी वेबसाईटला भेट द्या. होमपेजच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या ‘Login’ बटणावर क्लिक करा. तुमचा युझरनेम आणि पासवर्ड टाकून अकाऊंट लॉग-इन करा.
२. प्रवासाची माहिती भरा आणि रेल्वे शोधा
लॉग-इन झाल्यानंतर, तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ते स्थानक निवडा. ‘From’ मध्ये प्रवासाचे सुरुवातीचे स्टेशन आणि ‘To’ मध्ये अंतिम स्थानक टाका. त्यानंतर प्रवासाची तारीख, कोटा (Quota) आणि लागू असल्यास सवलत (Concession) निवडून ‘Search Trains’ वर क्लिक करा.
३. ट्रेन आणि सीट निवडा
आता तुमच्या स्क्रीनवर त्या मार्गावरील सर्व उपलब्ध ट्रेनची यादी दिसेल. यामध्ये ट्रेन सुटण्याची वेळ, पोहोचण्याची वेळ, प्रवासाचा एकूण वेळ आणि सीटची उपलब्धता (Seat Availability) स्पष्टपणे पाहता येईल. तुमच्या आवडीची ट्रेन आणि प्रवासाचा क्लास (उदा. 3AC, Sleeper) निवडून ‘Check Availability’ वर क्लिक करा आणि त्यानंतर ‘Book’ वर क्लिक करा.

४. प्रवाशांची माहिती भरा
पुढील पानावर जाण्यासाठी ‘Continue Booking’ वर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला प्रवाशांचे नाव, वय, लिंग (Gender) आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरावी लागेल.
५. ऑनलाईन पेमेंट करा आणि तिकीट मिळवा
माहिती भरून झाल्यानंतर पेमेंट पेजवर जा. येथे तुम्हाला नेट बँकिंग, यूपीआय (UPI – Paytm, PhonePe), रेझरपे (Razorpay), डेबिट/क्रेडिट कार्ड आणि डिजिटल वॉलेट्स असे अनेक सुरक्षित पर्याय मिळतील. तुमचे पेमेंट यशस्वी होताच, तुमचे तिकीट बुक होईल आणि स्क्रीनवर ‘ई-तिकीट’ (e-Ticket) जनरेट होईल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता.
