IRCTC New Website Launch : IRCTC वेबसाइटवरील कॅप्चाची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNIT)मधील विद्यार्थ्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या या समस्येचा गांभीर्याने विचार करत येत्या १ महिन्यात IRCTC ची नवीन वेबसाईट सुरू करण्याची घोषणा केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका विद्यार्थ्याने मंत्र्यांना “सर, कृपया IRCTC कॅप्चाची (captcha) समस्या सोडवा…” अशी विनंती करतो. यानंतर, मंत्र्यांनी ताबडतोब एका विभागीय अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितले, “सर्व विद्यार्थ्यांनी नवीन IRCTC वेबसाइटची मागणी केली आहे.” त्यानंतर त्यांनी ३० दिवसांच्या आत नवीन वेबसाइट तयार करणे शक्य आहे का, अशी विचारणा केली. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत नवीन IRCTC वेबसाइट लाँच केली जाईल असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी मंत्र्यांचे आभार मानले आणि टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

आयआरसीटीसीवर आणखी कोणत्या समस्या?

कॅप्चा व्यतिरिक्त, वापरकर्त्यांनी अनेकदा गर्दीच्या वेळेत वेबसाइट संथ होणे, क्रॅश होणे; अचानक लॉगआउट होणे; सीट निवडल्यानंतर पेमेंट फेल होणे; लॉगिन करताना त्रुटी येणे; ओटीपी (OTP) न येणे; तत्काळ बुकिंग दरम्यान येणाऱ्या अडचणी; आणि बॉट्स व एजंट्सद्वारे होणारा गैरवापर यांसारख्या समस्या मांडल्या आहेत.

गेल्याच वर्षी सरकारने २.५ कोटी युझर आयडी निष्क्रिय केल्याचे सांगितले होते. प्रगत क्वांटम कम्प्युटिंग लॅब या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी, MNIT मध्ये ‘प्रगत क्वांटम कम्प्युटिंग आणि क्वांटम कम्युनिकेशन्स लॅब’ स्थापन करण्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयसीटी अकॅडमिक प्रोजेक्ट (MeitY) अंतर्गत ही लॅब उभारली जाईल. ही लॅब क्वांटम की डिस्ट्रिब्युशन (QKD), क्वांटम कम्प्युटिंग सिम्युलेशन आणि क्वांटम सेन्सिंग हार्डवेअर घटकांमध्ये स्वदेशी क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना वैष्णव म्हणाले की, सध्याची तांत्रिक लाट एआयमुळे चालत असली, तरी पुढील मोठी तांत्रिक लाट क्वांटम तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली असेल. या प्रकल्पांतर्गत होणारे काम देशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. ही लॅब QKD मध्ये संशोधन करेल, जे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैष्णव आणि राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नगर यांच्या हस्ते मेकर्स लॅबचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी MNIT मध्ये AI लॅब स्थापन करण्याची घोषणाही केली. MNIT जयपूरच्या विद्यार्थ्यांना लॅम रिसर्चच्या सेमीव्हर्स प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी केली.

हे डिजिटल ट्विन-आधारित सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन आणि ट्रेनिंग इकोसिस्टम आहे. सेमीव्हर्सद्वारे विद्यार्थी आता सेमीकंडक्टर चिपची रचना 3D मध्ये पाहू शकतात, चिप निर्मितीची प्रक्रिया समजून घेऊ शकतात आणि आभासी वातावरणात फॅब्रिकेशन स्टेप्सचे सिम्युलेशन करू शकतात.