IRCTC New Website Tatkal Ticket Booking Update: रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ऐन तत्काळ बुकिंगच्या वेळी आयआरसीटीसी वेबसाईट हँग होणे, ‘कॅप्चा’ कोड न येणे किंवा पेमेंट अपयशी ठरण्याच्या त्रासातून आता प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या १५ जुलैपर्यंत IRCTC ची संपूर्णपणे नवीन आणि अत्याधुनिक वेबसाईट सुरू करण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, जयपूरमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी थेट रेल्वे मंत्र्यांसमोरच IRCTC च्या वेबसाईटवरील त्रुटींचा पाढा वाचला. त्यानंतर मंत्र्यांनी तातडीने ऑन-द-स्पॉट अधिकाऱ्यांना फोन लावून ३० दिवसांच्या आत नवी वेबसाईट तयार करण्याचे आदेश दिले.

…आणि रेल्वे मंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यालाच फोन लावला!

जयपूरच्या ‘मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हा रंजक किस्सा घडला. एका विद्यार्थिनीने थेट प्रश्न विचारला, “सर, आयआरसीटीसीचा कॅप्चा आणि ओटीपीचा प्रॉब्लेम प्लीज सोडवा, तत्काळ तिकीट बुकच होत नाही.” विद्यार्थ्यांची ही तक्रार ऐकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी क्षणाचाही विलंब न लावता मंचावरूनच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन जोडला. त्यांनी अधिकाऱ्याला विचारले, “विद्यार्थ्यांना तिकीट बुकिंगमध्ये खूप अडचणी येत आहेत, त्यांना नवीन वेबसाईट हवी आहे. आपण येत्या ३० दिवसांत हे करू शकतो का?” अधिकाऱ्याने होकार देताच, मंत्र्यांनी १५ जुलैपर्यंत नवी वेबसाईट लाईव्ह होईल अशी घोषणा केली, ज्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

तिकीट बुकिंगमध्ये नेमके काय बदल होणार?

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वेबसाईटमध्ये प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी अत्यंत प्रगत आणि वेगवान तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

  • लोडिंग आणि हँग होण्याचा त्रास संपणार: तत्काळ बुकिंगच्या वेळेस येणारा प्रचंड ट्रॅफिकचा ताण ही वेबसाईट सहज हाताळू शकेल.
  • कॅप्चा आणि ओटीपीची गती वाढणार: लॉगिन करताना किंवा तिकीट बुक करताना अडकणारे कॅप्चा कोड आणि ओटीपी आता सेकंदाच्या आत उपलब्ध होतील.
  • मल्टिलिंग्वल इंटरफेस: ही वेबसाईट अधिक युझर-फ्रेंडली आणि बहुभाषिक असेल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही सहज तिकीट बुक करता येईल.
  • फेअर कॅलेंडर आणि सीट निवड: प्रवाशांना तिकीट बुक करण्यापूर्वीच वेगवेगळ्या तारखांचे भाडे (Fare Calendar) एकाच ठिकाणी पाहता येईल, तसेच सीट निवडणे अधिक सोपे होईल.
  • विशेष सवलतींचे एकत्रीकरण: दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी असलेल्या विशेष सवलतींचे पर्याय अधिक सुटसुटीत केले जातील. मिनिटाला १.५ लाख तिकिटे बुक होणार! ४० वर्षांची जुनी यंत्रणा बदलणार

भारतीय रेल्वे आगामी ऑगस्ट महिन्यापासून आपली तब्बल ४० वर्षे जुनी ‘पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम’ (PRS) पूर्णपणे अपडेट करणार आहे. देशातील एकूण तिकीट बुकिंगपैकी तब्बल ८८ टक्के बुकिंग हे ऑनलाईन माध्यमातून होते. हेच लक्षात घेऊन रेल्वे आपली क्षमता ५ पटीने वाढवत आहे.

नव्या यंत्रणेची ताकद: सध्याच्या सिस्टीममध्ये एका मिनिटाला केवळ ३२ हजार तिकिटे बुक होतात, मात्र नवीन प्रणाली लागू झाल्यावर एका मिनिटाला १.५ लाखाहून अधिक तिकिटे बुक करता येतील. तसेच, चौकशी (Enquiry) करण्याची क्षमता प्रतिमिनिट ४ लाखांवरून थेट ४० लाख होणार आहे.

रेल्वेच्या ‘RailOne’ सुपर ॲपचा वापर करण्याचे आवाहन

या संवादादरम्यान रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत ‘RailOne’ या सुपर ॲपचा वापर करण्याचा सल्ला दिला. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या ॲपमध्ये जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि आरक्षित तिकीट बुकिंग एकत्र करण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असून, तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे, याचे अचूक भाकीत हे ॲप वर्तवते. सध्या या ॲपला कोट्यवधी प्रवाशांनी पसंती दिली आहे.