अमेरिका-इराणमधील युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार? याबाबत संभ्रम कायम आहे. सध्या पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता करारासाठी दोन्ही देशाच्या हालचाली सुरू असल्या तरी ठोस निर्णयापर्यंत दोन्ही देश पोहोचलेले नाहीत. या दोन्ही देशातील तणावाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

कारण होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव असल्याने कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता इराणने अमेरिकेला नवा १४ कलमी शांतता प्रस्ताव दिल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे अमेरिकेला इराणचा हा नवा प्रस्ताव मान्य असेल का? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.

यातच आता इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडे दोनच पर्याय असल्याचं इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटलं आहे. तसेच ते दोन पर्याय कोणते? हे देखील सांगितलं आहे.

इराणने अमेरिकेला कोणते दोन पर्याय दिले?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) रविवारी एका निवेदनात म्हटलं की, “जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारं हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्लामिक प्रजासत्ताकसोबत एक ‘अशक्य’ लष्करी मोहीम किंवा एक ‘वाईट करार’ यापैकी एकाची निवड करावी लागेल.”

आयआरजीसीच्या गुप्तचर शाखेनं म्हटलं की, अमेरिकेच्या निर्णयक्षमतेची व्याप्ती ‘संकुचित’ झाली आहे. या अनुषंगाने त्यांनी राजनैतिक क्षेत्रातील अनेक बदलांचा दाखला देखील दिला. जसं की अमेरिकेला नौदल नाकेबंदी संपवण्यासाठी इराणने दिलेली एक महिन्याची मुदत, तसंच वॉशिंग्टनबद्दल रशिया, चीन आणि युरोपच्या भूमिकेत झालेला बदल. या पार्श्वभीवर आयआरजीसीने म्हटलं की, “याचा एकच अर्थ निघतो. ट्रम्प यांना ‘अशक्य लष्करी मोहीम किंवा इस्लामिक प्रजासत्ताक इराणबरोबर एक वाईट करार’ यापैकी एकाची निवड करावी लागेल. कारण अमेरिकेच्या निर्णयक्षमतेची व्याप्ती संकुचित झाली आहे.”

शांतता चर्चा ठप्प का आहे?

दरम्यान, अमेरिका-इराणमधील युद्धविराम लागू आहे. मात्र, असं असतानाही अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा सध्या ठप्प आहे. त्यामुळे शांतता चर्चा पुढे का जात नाहीये? याबाबत आता सवाल उपस्थित केले जात आहेत.

इराणचा अमेरिकेला नवा शांतता प्रस्ताव

इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणने हा प्रस्ताव दिला असून तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध पूर्णपणे संपवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इराणमधील माध्यमांनी दिलं आहे.

इराणच्या नव्या प्रस्तावात काय आहे?

वृत्तानुसार, इराणने अमेरिकेकडे अशी मागणी केली की, ‘लेबनॉनसह सर्व युद्ध थांबवावं, नौदल नाकेबंदी हटवावी, संपूर्ण सैन्य मागे घ्यावं, इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत, इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी’, अशा विविध १४ अटी इराणने अमेरिकेला दिलेल्या प्रस्तावात ठेवल्या आहेत.