Iran Warship IRIS Dena attacked by US Submarine: इराणच्या IRIS देना या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केल्यानंतर ही युद्धनौका हिंद महासागरात बुडाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने प्रथमच अशाप्रकारे पाणबुडीने हल्ला केल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेट यांनी सांगितले होते. या हल्ल्यानंतर आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेला त्यांच्या या कृत्याबद्दल पश्चाताप करावा लागेल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची सय्यद अब्बास अराघची यांनी दिला आहे.

एक्सवर अराघची यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, “इराणच्या किनाऱ्यापासून २,००० मैल दूर असलेल्या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला. ही नौका भारताच्या निमंत्रणावर गेली होती. त्यात १३० खलाशी होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकेने हा क्रूर हल्ला केला.”

IRIS देना युद्धनौका बुडालेल्या ठिकाणी ८७ मृतदेह सापडल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली. तसेच ३२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेने या हल्ल्याचा व्हिडीओही प्रसारित केला आहे. त्यानंतर इराणची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

हिंदी महासागरात बुडाली युद्धनौका

४ मार्च रोजी पहाटे श्रीलंकेच्या गॅलेच्या दक्षिणेस सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर इराणी नौदलाची युद्धनौका IRIS देना बुडाली. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्धातील आतापर्यंतची ही पहिली नौदल कारवाई होती.

श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याला पाणबुडीतील टॉर्पेडो हल्ला असल्याचे म्हटले. बुधवारी पहाटे ५.०८ ते ५.३० च्या दरम्यान पाण्याखाली मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले. हल्ल्यानंतर युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले आणि पाणी शिरल्यामुळे जहाज काही मिनिटांतच बुडाले.

अमेरिकेने प्रसिद्ध केला व्हिडिओ

इराणी युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेच्या युद्ध विभागाने प्रसिद्ध केला आहे. हल्ल्यानंतर युद्धनौकेच्या चिंधड्या उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच, पाण्याच्या उंच लाटा आणि आगीचे लोटदेखील दिसून आले.

इराणी युद्धनौका सरावासाठी होती भारताच्या दौऱ्यावर

इराणी युद्धनौका IRIS देना भारतात सरावासाठी आली होती. सरावानंतर या युद्धनौकेचा परतीचा प्रवास सुरु होता. बंगालच्या उपसागरात १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सरावात भाग घेणार असल्याचे सरावाच्या वेळापत्रकात नोंद दिसून येते. भारतीय पूर्व नौदल कमांडने विशाखापट्टणम येथे या इराणी जहाजाचे स्वागत केले होते.