नोएडा येथील एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी भारतीय महसूल सेवा विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. सौरभ मीना असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्या मैत्रिणीचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला या मुलीने आत्महत्या केली असावी असं पोलिसांनी वाटलं होतं. कारण या तरुणीचा मृतदेह चादरीने लटकलेल्या अवस्थेत होता. मात्र या तरुणीच्या कुटुंबाने या प्रकरणी आयआरएस अधिकारी सौरभ मीनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यातला एक आरोप हादेखील आहे की सौरभ मीनाने आमच्या मुलीला फसवलं. लग्नाचं आमीष दाखवून तीन वर्षे तिच्यासह प्रेमसंबंध ठेवले. यानंतर पोलिसांनी सौरभ मीनाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मृत मुलीच्या कुटुंबाने केलेल्या आरोपांनुसार ही मुलगी आणि सौरभ मीना या दोघांचे मागच्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ब्लू वर्ड सोसायटी या ठिकाणी सौरभ मीनाचा फ्लॅट आहे. या ठिकाणी हे दोघं कायम भेटत असत. मृत मुलीचं नाव शिल्पा असल्याचं समजलं आहे. शिल्पा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या ठिकाणी एचआर म्हणून कार्यरत होती. तिचा मृतदेह लोटस ब्लूवर्ड सोसायटीच्या आठव्या क्रमांकाच्या टॉवरमध्ये एका घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. शिल्पा गौतमच्या कुटुंबाने या प्रकरणात सौरभ मीनावर आरोप केले आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- पत्नीच्या मदतीने प्रेयसीची, तिच्या मुलाची हत्या; मद्य देऊन जंगलात नेलं अन्…, हातावरचा टॅटू लपवण्यासाठी कातडीही सोलली!

डेटिंग अॅपद्वारे शिल्पा आणि सौरभची ओळख

शिल्पा आणि सौरभ यांची ओळख डेटिंग अॅपद्वारे झाली होती. शिल्पाचे वडील गौतम यांनी हा देखील आरोप केला आहे की सौरभ शिल्पाला शिवीगाळ करत असे, तसंच तिला मारहाणही करत असे. त्याने तिला वारंवार लग्नाचं वचन दिलं होतं पण ते पाळलं नव्हतं. तो तिचा लैंगिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप गौतम यांनी केला आहे. तसंच हल्ली त्यांच्यात जरा जास्त खटके उडत होते असंही त्यांनी सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी सौरभ मीनाला अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणी काय सांगितलं आहे?

ओ.पी. गौतम यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिल्पा गौतमची हत्या केल्या प्रकरणी सौरभ मीनाला अटक केली. पोलिसांनी सौरभ मीनाच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त मनिष कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभला कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणातले धागेदोरे आम्ही शोधत आहोत. शिल्पा आणि सौरभ यांचे मोबाइल फोन त्यावरचे चॅट्स, फोन कॉल्स आणि इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज यावरुन आम्ही पुरावे गोळा करत आहोत असंही मिश्रा यांनी सांगितलं आहे.