Elon Musk Starlink India License status sparks major controversy: स्पेसएक्स, टेस्ला यासारख्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतात अडवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भारतातील काही धनदांडगे व्यावसायिक स्वतःची मक्तेदारी टिकवण्यासाठी स्टारलिंकला भारतात परवाना मिळण्यापासून रोखत आहेत, असे मस्क यांनी म्हटले होते. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांचा आरोप फेटाळून लावत स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचे म्हटले. त्यानंतर आता काही तासांतच मस्क यांनी थेट अंबानी यांचे नाव घेऊन भारतावर आरोप केला आहे.

एलॉन मस्क यांनी नव्याने केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “स्टारलिंकला १६५ पेक्षा जास्त देशांमध्ये परवाना मिळाला आहे. भारतात परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या प्रत्येक कायद्याचे आणि नियमांचे पालन केले. पाच वर्षे घालवली तरी अजून परवाना का नाही मिळाला? अंबानी हेच भारताचे खरे मालक आहेत का?”

स्पेस एक्सच्या माध्यमातून जगभरात उपग्रह आधारित इंटरनेट क्रांती घडवून आणणारे अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांना भारतात प्रवेश करणे अद्याप शक्य झालेले नाही. स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू होण्यापूर्वीच नव्या नियामक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांमध्ये अडकली.

नियामक आणि इतर यंत्रणांशी अनेक वर्षे चर्चा करूनही स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला उशीर होत असल्यामुळे एलॉन मस्क यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. त्यांनी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील एकाधिकारशाहीवर थेट टीका केली. तसेच त्यांनी ओलिगार्क (Oligarchs) असा शब्द वापरत काही धनदांडगे लोक आम्हाला अडवत आहेत, असा आरोप केला. हा भारताच्या जनतेविरुद्ध केलेला गुन्हा आहे, असाही आरोप त्यांनी यापूर्वीच्या पोस्टमध्ये केला होता.

स्टारलिंक काय आहे?

एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी स्पेसएक्स या अंतराळ कंपनीची उपग्रह आधारित हाय-स्पीड इंटरनेट सेवा देणारी उपकंपनी आहे. स्टारलिंकचे उपग्रह पृथ्वीच्या खूप कमी उंचीवरून फिरतात. त्यामुळे डेटा ट्रान्सफर वेगाने होते आणि इंटरनेट रिस्पॉन्स वेळ साधारण २५ ते ३५ मिलीसेकंद इतका कमी आहे. जिथे केबल, फायबर आणि मोबाइल नेटवर्क पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम भागात स्टारलिंकचे इंटरनेट सहज पोहोचू शकते. यासाठी ग्राहकांना स्टारलिंकचे किट घ्यावे लागेल. ज्यात एक डिश, वाय-फाय राउटर आणि केबल्स समाविष्ट असतात.

नेमका वाद काय?

स्टारलिंकला टक्कर देणारा उपग्रह इंटरनेट कार्यक्रम रिलायन्स जिओनेही जाहीर केला आहे. जिओकडून भारतात सुमारे १,६०० पृथ्वीच्या निम्न कक्षेतील उपग्रहाचे (Low Earth Orbit Satellites) जाळे विकसित करणार असल्याची योजना आखत आहे, अशी माहिती जागरण या वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे. ‘इंडिया मोबाइल काँग्रेस २०२६’ या परिषदेत बोलताना आकाश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली होती.

जिओकडूनही उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू होणार असल्यामुळे स्टारलिंकचा परवाना अडवला जात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने एलॉन मस्क यांनी उपस्थित केला आहे. यानंतर हा वाद सुरू झाला.

भारताचेही प्रत्युत्तर

दरम्यान एलॉन मस्क यांनी केलेल्या आरोपाला पीआयबीने निवेदनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते. “सरकारने उपग्रह दळणवळण सेवांसह सर्व दूरसंचार सेवांसाठी एक निष्पक्ष आणि भेदभावाला थारा न देणारी चौकट तयार केली आहे. ही व्यवस्था किंवा तिची अंमलबजावणी अन्यायकारक अथवा भेदभाव करणारी असल्याचे म्हणणे निराधार आणि चुकीच्या समजुतीवर आधारित आहे”, असे पीआयबीने स्पष्ट केले होते.