“…मग राजकारणात अपमानाला स्थान आहे का?”; काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

राजकारण आणि राग यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे.

Is Insult Aloud In Politics Captain Amrinder Singh Questions To Congress gst 97

पंजाब काँग्रेसमधील मतभेद शांत करण्याच्या प्रयत्नात असताना आता पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्वच वादात सापडलं आहे. त्यामुळे, आता काँग्रेसमध्ये ‘राग आणि अपमान’ यावर युद्ध सुरू झालं आहे. राजकारण आणि राग यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवरून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे. “जर राजकारणात रागाला स्थान नसेल तर मग अपमानाला आहे का? असा सवाल अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे, काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पंजाब काँग्रेसमधील कलह दूर करण्यासाठी हायकमांडने केवळ पक्षाचाच नव्हे तर राज्यातील सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र, काँग्रेसची चिंता कायमच आहे. कारण, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सातत्याने संकेत देत आहेत की येत्या काळात ते काही मोठी पावलं उचलू शकतात. यामुळे पक्षाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. अमरिंदर सिंग यांच्या आक्रमक स्वभावामुळे अगदी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासूनच काँग्रेस काळजीत असल्याचं म्हटलं जातं. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेस हायकमांडवर हा थेट हल्ला चढवला आहे.

अमरिंदर सिंग नक्कीच शब्दांचा पुनर्विचार करतील!

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांना एक सल्ला देताना त्या असं म्हणाल्या की, “राजकारणात राग, द्वेष, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर टिप्पणी करणं आणि त्याच्यावर सूड उगवणं या सगळ्या गोंष्टींसाठी कोणतीही जागा नाही. मला आशा आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग नक्कीच समजूतदारपणा दाखवून आपल्या शब्दांचा पुनर्विचार करतील.” पुढे सुप्रिया श्रीनेत यांनी असंही म्हटलं की, “जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर मी त्यावर टिप्पणी करणार नाही.”

माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासोबत असं होतं, तर…!

सुप्रिया श्रीनेटच्या या विधानावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांच्याद्वारे निवेदन जारी करून प्रत्युत्तर देण्यास जराही विलंब केला नाही. “राजकारणात रागाला स्थान नसेल तर अपमानाला जागा आहे का? माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या बाबतीत असं होऊ शकतं तर कार्यकर्त्यांचं काय होईल?”, असा सवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेसला नेतृत्त्वाला विचारला होता.

मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील यापूर्वी काँग्रेस नेतृत्वावर आपला अपमान केल्याचा आरोप केला होता. नंतर, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आता ते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. काँग्रेसच्या इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांची अशीच व्यथा असल्याचं वारंवार म्हटलं जातं. यापूर्वी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनीही काँग्रेस नेतृत्वाविरोधात बंडखोर वृत्ती दाखवली होती आणि वेगळा पक्ष काढण्याची धमकीही दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is insult aloud in politics captain amrinder singh questions to congress gst

फोटो गॅलरी