इराणवर इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत क्षेपणास्त्रं डागली आणि त्यांचे प्रमुख खामेनी यांना ठार केलं. ज्यानंतर या तिन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. कच्च्या तेलाची कमतरता जगात भासेल का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसंच हा संघर्ष दिवसेंदिवस वाढेल का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष कार्यक्रमात सध्याच्या या स्थितीबाबत सविस्तर विश्लेषण केलं आहे.

काय म्हणाले गिरीश कुबेर?

“आज जागतिक अर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे. दोन प्रमुख कारणं आहेत एक म्हणजे ठिकठिकाणचे भांडवली बाजार आपटले, कोसळले. भारतात २४०० अंकांनी निर्देशांक आदळला आणि मग शेअर बाजार सुरु झाला. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे तेलाचे दर ११५ डॉलर प्रति बॅरल असे गेले. ८५ ते ९० डॉलर प्रति बॅरल असे हे दर होते, इतकी मोठी दरवाढ गेल्या काही वर्षांत झालेली नव्हती. २०१२ मध्ये बँकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तेव्हा कच्च्या तेलाचे दर १४७ डॉलर प्रति बॅरल इतके गेले होते. ती वेळ अजून आलेली नाही. पण जागतिक तेल तज्ज्ञ तेलाचे दर असेच वाढत राहतील अशी भीती व्यक्त करत आहेत. तेलाचे दर जेव्हा १०० डॉलर प्रति बॅरल झाले तेव्हा समाज माध्यमांवर पुण्यातले जोशी काका स्कूटर ढकलत आहेत अशी चर्चा झाली होती. त्यावेळी मनमोहन सरकारवर टीकाही झाली होती. अनेक कुचकट प्रतिक्रिया त्यावेळी समोर आल्या होत्या.”

अमेरिका, इराण इराक संबंधांचा थोडक्यात इतिहास काय?

पुढे गिरीश कुबेर म्हणाले, “पश्चिम आशियात ज्या काही सुरु आहे त्यामुळे ही सगळी स्थिती ओढवली आहे. नेत्यान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही वेळ आणली. पॅलेस्टाईन भूमीमध्ये या पंतप्रधानांनी ७० हजार माणसं मारली आहेत. त्यांच्या नादाला लागून ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला. खामेनी यांची हत्या केली. चुटकीसरशी आम्ही हे युद्ध संपवू हे सांगणाऱ्या ट्रम्प यांना काही आठवड्याच्या युद्धाची भाषा करावी लागली. सौदी अरेबियाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलू शकणारा एकमेव देश होता आणि आहे तो म्हणजे इराण. इराण हा शिया बहुल देश आहे. इराणचा १९५५ पासून आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर स्वतःच्या पायावर उभा असलेला हा देश आहे. खोमेनी यांनी धर्मक्रांती करुन शाहा यांना पळून जायला भाग पाडलं. इराणची सत्ता खोमेनी यांच्या हाती १९७९ मध्ये आली. त्याच वर्षी सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्या. त्यानंतर काही कालावधीने इराण आणि इराक यांच्यात युद्ध सुरु झालं. त्या युद्धाचा दाखला अशासाठी द्यायचा कारण तेव्हा इराण आणि इराक दोन्ही देशांना अमेरिकेने शस्त्रं पुरवली होती. आपण लहानपणी दोन बोक्यांची आणि माकडाची गोष्ट ऐकलेली असते. या दोन्ही देशांमधला लोणी खाणारा कुठला देश होता तर तो इस्रायल. दोन्ही देशांना शस्त्र पुरवण्यासाठी दलालीची भूमिका इस्रायलने निभावली होती.” असं गिरीश कुबेर यांनी सांगितलं.

युद्धाचा शेवट कधी आणि कसा होणार हे ट्रम्पनाही माहीत नाही आणि नेत्यानाहूंनाही नाही-गिरीश कुबेर

१९९० मध्ये अयातुल्ला खोमेनी सत्तेवर होते. त्याच्या हाताखाली तयार खामेनी तयार झाले होते. अमेरिकेच्या कच्छपी लागायचं नाही, इस्रायलला उभं करायचं नाही हे धोरण इराणने इतकी वर्षे राबवलं. पश्चिमी आशियातील देशांमध्ये इराण हा देश असा होता ज्याने अमेरिकेला कोलावलं आणि इस्रायलला टांगणीला लावलं. त्यातूनच हे युद्ध निर्माण केलं गेलं. नेत्यानाहू यांना ही गरज होती. एपस्टिन प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे हातच नाही संपूर्ण ट्रम्प अडकले आहेत. या सगळ्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी सोपा मार्ग होता की इस्रायलला युद्धाला हो म्हणणं. मथळ्यांमध्ये संदेश देण्याची गरज असते. त्यानुसार हे सगळं केलं गेलं. पण मानवी मूल्यांचा विचारही इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. कुठलाही हल्ला झाला किंवा युद्ध झालं की त्याचा शेवट काय होणार हे माहीत असतं. इथे पंचाईत अशी आहे की नेत्यानाहू आणि ट्रम्प यांना माहीत नाही की युद्ध थांबावयचं कुठे आणि कधी? चुटकीसरशी असा शब्द वापरला जातो पण अशा गोष्टी कधी होत नाहीत. ज्या युद्धासाठी या दोन्ही देशांनी एकमेकांचे हात धरले त्यात दोघांचे हेतू वेगळे होते. इस्रायलला खामेनी यांचं मरण हवं होतं तर अमेरिकेला इराणमध्ये राजवटीत बदल हवा होता. रेजिम चेंज हा ट्रम्प यांनी वापरलेला शब्द आहे. पण तो झालेला नाही. कारण मुस्तफा खामेनी यांची निवड पुढचा सर्वोच्च नेता म्हणून इराणने केली आहे असंही गिरीश कुबेर यांनी सांगितलं.

इराणकडे किती शस्त्रसाठा आहे त्याची कल्पना अमेरिकेलानाही-गिरीश कुबेर

इराणकडे काय ताकदीची शस्त्रं आहेत याची कल्पना अमेरिकेलाही नाही आणि इस्रायललाही नाही. इराण अणुबॉम्ब तयार करतो आहे या बागुलबुव्याखाली कथा रचली गेली. पण ती कथा कोसळते आहे हे निष्पन्न झालं. कारण आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगासह सगळ्यांनी प्रशस्तिपत्रक दिलं की इराण अणुबॉम्ब तयार करत नाही. त्यानंतर या दोघांचा कावा उघड झाला. इराणने आसपासच्या देशांतील तेलसाठ्यांना हात घालण्याआधी बहारिन, कुवेत या देशांमधल्या समुद्रातल्या खाऱ्या पाण्यापासून जे गोडं पाणी तयार करतात त्या यंत्रणा उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे बहारिन सारख्या देशावर पाण्याची टंचाई आहे. हा इराणच्या नेतृत्वाचा म्हटलं तर शहाणपणा आहे आणि वेडेपणाही. कारण ही वेळ इराणवरही येऊ शकते असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.