इशरत जहाँ प्रकरणात गुजरात पोलिसांविरुद्ध सुरू असलेले खटले बंद करून त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी ही सुनावणी १मार्चला होणार होती. या विषयावर डेव्हिड हेडली याने दिलेल्या नव्या जबानीच्या पाश्र्वभूमीवर एम. एल. शर्मा या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई हल्ल्यातील माफीचा साक्षीदार हेडली याने अमेरिकेतून दिलेल्या जबानीनुसार इशरत लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती आणि ती तिच्या साथीदारांसह गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कामगिरीवर होती. इशरतसह चार दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांनी जून २००४ मध्ये झालेल्या चकमकीत ठार मारले होते. ही चकमक बनावट असल्याच्या दाव्यावरून गुजरातच्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर खटले सुरू आहेत. आता नव्या माहितीनुसार ते अनावश्यक ठरतात, असे म्हणत शर्मा यांनी ते रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.