‘सीआयए’च्या माजी संचालकांचा दावा
न्यूयॉर्क : पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या गुप्तचर संस्थेला अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या ठावठिकाण्याबाबत कुठलीही माहिती नव्हती, असे अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे माजी संचालक जनरल डेव्हिड पेट्रीयस यांनी म्हटले आहे. लादेनविषयी आयएसआयने दिलेल्या गुप्तचर माहितीमुळेच अमेरिका त्याला ठार मारू शकली, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत फॉक्स न्यूज वाहिनीशी बोलताना केला होता त्याला उत्तर देताना पेट्रीयस यांनी हे वक्तव्य केले आहे.
लादेन याला अमेरिकेच्या नौसैनिकांनी एका गुप्त कारवाईत पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ठार मारले होते. पेट्रीयस यांनी भारतीय दूतावासात मंगळवारी आयोजित संवाद कार्यक्रमात सांगितले की, लादेन त्यांच्या देशात लपलेला आहे हे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला माहिती नव्हते. लादेन कुठे आहे हे कुणालाच माहिती नव्हते याची आम्हाला खात्री आहे. पाकिस्तानने त्याला अबोटाबाद येथे राहण्याची परवानगी दिली होती असा काहींचा दावा असेल पण ते पटणारे नाही.
दहशतवाद विरोधी मोहिमात पाकिस्तानी अधिकारी कधीच उत्तर वझिरीस्तानच्या अंतर्गत भागात पोहोचले नाहीत. त्या भागात हक्कानी नेटवर्क, अल कायदा व इतरांची मुख्यालये होती असे सांगून ते म्हणाले की, लादेन तेथे नाही हे अमेरिकेला नंतर कळले व तो अबोटाबाद येथे पाकिस्तानी लष्करी अकादमीजवळ राहात असल्याची खबर मिळाली. त्यापूर्वी आपण या अकादमीत एकदा गेलो असता हेलिकॉप्टरने त्या परिसरावरून चक्कर मारली होती.
इम्रान खान हे सध्या त्यांच्या देशापुढील आव्हाने पेलू शकतील अशी आशा आहे. कारण त्यांची अर्थव्यवस्था संकटात आहे, तेथील वास्तव परिस्थिती खूपच बिकट आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.