आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी हा अमेरिकी आघाडीच्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराकनजीक सीरियाच्या सीमेवर आयसिसच्या मुख्यालयावर हल्ले करण्यात आले. इराकच्या अल सुमारिया या दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीने असा दावा केला की, इराकच्या निनेवह प्रांतात बगदादी जखमी झाला असून आयसिसचे इतर काही दहशतवादीहीही या कारवाईत जखमी झाले आहेत. काल अमेरिकी आघाडीने हा हल्ला केला आहे. आंतरराष्ट्रीय आघाडीने काल आयसिसच्या ठिकाणांवर इराक-सीरिया दरम्यानच्या सीमेवर हल्ले केले हा भाग निनेवेहपासून पश्चिमेला ६५ किलोमीटर अंतरावर आहे. बगदादी हा जखमी झाला असून त्यात इतर अतिरेक्यांचाही समावेश आहे, गुप्तचर माहितीच्या आधारे हे हल्ले करण्यात आल्याने त्यात आयसिसच्या मुख्यालयातील हल्ल्यात बगदादी जखमी झाला असे एक्स्प्रेस युके या वृत्तपत्राने म्हटले आहे. बगदादी व आयसिसचे इतर दहशतवादी मोटारींनी सीरियातून इराककडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. अमेरिकी आघाडीने सांगितले की, आम्ही या बातम्या बघितल्या आहेत पण त्याची खातरजमा झालेली नाही. गेल्या काही वर्षांत बगदादी जखमी झाल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. अगदी त्याचा मृत्यू झाल्यापर्यंत सांगण्यात आले पण त्याची निश्चिती होऊ शकली नाही. बगदादी १८ मार्च २०१५ मध्ये गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या पाठीच्या कण्यावर नंतर उपचार करण्यात आले. त्या दुखापतीमुळे बगदादी जायबंदी झाला असेही सांगण्यात आले होते. २०११ मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे इनाम लावले होते. २०१० मध्ये तो आयसिसचा प्रमुख झाला. त्यानंतर २०१४ मध्ये तो सीरिया व इराकमधील काही भागांतील खिलाफतचा प्रमुख बनला.