‘पॅरिसवरील दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश’
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसवरील दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचे सांगतानाच, इस्लामिक स्टेट (आयसिस) अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा खबरदारीचा इशाराही अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी दिला आहे.
पॅरिसवरील हल्ला हा गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे घडला. आठपैकी एकवगळता इतर दहशतवादी आयसिसने सीरियामध्ये प्रशिक्षण दिलेले फ्रेंच नागरिक होते. कुणाच्याही लक्षात न येता ते परत आले आणि त्यांनी सहा ठिकाणांवर हल्ले करून १३० लोकांचे बळी घेतले, असे सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी सांगितले. आयसिस बहुधा आणखी काही कारवाई करण्याचे कारस्थान रचत आहे, मात्र अमेरिकेला त्याची पूर्ण कल्पना नाही, असा इशारा त्यांनी एका मुलाखतीत दिला.
दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसिस अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच संपर्क यंत्रणेचा वापर करत आहे. हल्ले करण्यासाठी लोकांना भडकवण्यासाठी ते अतिरेकी युद्धसाहित्य किंवा जे काही आवश्यक असेल त्याचा वापर करतील हे मला अपेक्षित आहे. हे प्रयत्न यशस्वी होतीलच असे नसले, तरी तसे प्रयत्न नक्कीच होणार आहेत. आयसिस अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, ही गोष्ट अटळ असल्याचे ब्रेनन म्हणाले. आपल्याला आणखी अनुयायी मिळावेत यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रे आणि मुस्लिम जगत यांच्यात संघर्ष पेटवण्याचा आयसिस प्रयत्न करत आहे. त्यासाठी अमेरिका तुमचे देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा नितांत खोटा दावा ते करत आहेत, असे ब्रेनन म्हणाले.
केवळ अतिशय चांगल्या गुप्तचर जाळ्यामुळे या लोकांना रोखण्यात, प्रतिबंध करण्यात व त्यांची चौकशी करण्यात यश आले आहे, असेही सीआयएच्या संचालकांनी सांगितले.
आयसिसला रासायनिक शस्त्रे आणि युद्ध साहित्य हाताळण्याची संधी असल्याचे कळले असून, कमी प्रमाणात क्लोरिन व मस्टर्ड वायू तयार करण्याचीही आयसिसची क्षमता असल्याची माहिती सीआयएला आहे. आयसिस या रासायनिक शस्त्रांची पाश्चिमात्य देशांत वाहतूक करण्याची पुरेपूर शक्यता आहे. त्यामुळे ते वापरत असलेले वाहतुकीचे व तस्करीचे मार्ग बंद करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत ब्रेनन यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.

“मला त्या मंदिरात…”, मजुरांच्या सुटकेसाठी आलेले तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स यांचं वक्तव्य; म्हणाले, “हा चमत्कार…”