फ्रान्समध्ये रिव्हिएरामधील नाइस येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी ट्रक हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी गटाने घेतली आहे, त्यात एका टय़ुनिशियन व्यक्तीने फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नाईस येथील सागर किनाऱ्यावरील आतषबाजी पाहण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये ट्रक घुसवून तो दोन कि.मी वेगात नेला होता, त्यात ८४ जण ठार झाले होते. फ्रान्समध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था अपयशी ठरत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमाक या आयसिसच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, आमच्या एका योद्धय़ाने गुरुवारी रात्री हल्ला केला. आयसिसविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडीने जी कारवाई केली त्याचा आम्ही सूड उगवित आहोत. टय़ुनिशियाचा महंमद लहोइज बोहलेल (३१) याने १९ टनी ट्रकखाली रिव्हिएरा शहरातील नाइस येथे अनेकांना चिरडले होते. मिडी लिब्रे या वृत्तपत्राने म्हटले आहे की, सरकार जर खरोखर दहशतवादाविरोधात युद्ध छेडत असेल तर गुप्तचर माहितीला महत्त्व आहे. अपयश व विजय या दोन्हींचे विश्लेषण केले पाहिजे. ल फिगारो या वृत्तपत्रानेही आता कठोर भूमिका घेतलीच पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. गुरुवारी तीस हजार लोक राष्ट्रीय दिनानिमित्त आतषबाजी पाहण्यासाठी जमले असताना हल्लेखोराने ट्रक हल्ला केला होता. ती रात्र अनेकांसाठी काळरात्र ठरली व अनेक मृतदेहांचा सडाच रस्त्यावर पडला. अजून पन्नास जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत. आयसिसने यापूर्वी १३ नोव्हेंबरला पॅरिसमध्ये हल्ल्यात १३० जणांना ठार केल्याची तसेच शार्ली हेब्दो साप्ताहिकावरील जानेवारी २०१५ मधील हल्ल्याची तसेच ज्यू सुपरमार्केटवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. फ्रान्समध्ये मुस्लिम लोकसंख्या ५ दशलक्ष असून शेकडो जिहादी तेथे आले आहेत, असे सांगितले जाते. काळजी घेतली असती तर गुरुवारची घटना टाळता आली असती, असे माजी पंतप्रधान अलेन जुप्पे यांनी म्हटले आहे. सरकारी प्रवक्ते स्टीफनी ले फॉल यांनी सांगितले की, घटनास्थळी पुरेशी सुरक्षा होती. त्यामुळे काळजी घेतली नव्हती हे म्हणणे चुकीचे आहे.

ट्रकचालकाच्या पत्नीसह चौघे अटकेत

फ्रान्समध्ये रिव्हिएरा शहराचा भाग असलेल्या नाईस या ठिकाणी झालेल्या दहशतवादी ट्रक हल्ल्यात ८४ जण गुरुवारी मारले गेले होते, त्यात पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून ते टय़ुनिशियाशी संबंधित आहेत. नाइस येथे फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आतषबाजी पाहण्यात पर्यटक व इतर लोक दंग असताना एका व्यक्तीने गर्दीत वेगाने ट्रक घुसवून २०० जणांना त्याखाली चिरडत नेले. त्यातील ८४ जण ठार झाले होते. हल्लेखोर हा टय़ुनिशियन वंशाचा होता व त्याचे नाव महंमद लाहोएज बोहलेल होते असे नंतर निष्पन्न झाले. एका व्यक्तीने या ट्रकचा पाठलाग करून चालकाच्या केबिनमध्ये घुसून हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो चाकाखाली सापडून ठार झाला होता. एका व्यक्तीला कालच अटक करण्यात आली असून आज सकाळी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रकचालकाच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाइस ओलाँद यांनी सशस्त्र दलांच्या प्रमुखांची व मंत्र्याची भेट घेऊन सुरक्षा सल्लागारांशीही चर्चा केली. महंमद लाहोएज बोहलेल (वय ३१) याने १९ टनांचा ट्रक १४ जुलैला बॅस्टिली दिनानिमित्त आतषबाजी पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत घुसवला होता. त्यात १० मुलांसह ८४ जण ठार झाले तर इतर ५० मुले जखमी झाली होती. त्यांच्यातील अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. चौकशीकर्त्यांनी घटनाक्रम जुळवण्याचे प्रयत्न चालवले असून पुराव्यांचीही जमवाजमव सुरू केली आहे. बोहलेल हा किरकोळ गुन्हेगार होता. त्याने हे कृत्य केले असून त्याचा दहशतवादी गटांशी संबंध नाही असे सकृतदर्शनी सांगण्यात आले. पंतप्रधान मॅन्युअल व्हॉल्स यांनी सांगितले की, हल्लेखोराचे मूलतत्त्ववादी इस्लामशी संबंध असावेत. अंतर्गत सुरक्षा मंत्री बेर्नार्ड कॅझेनेव्यू यांनी सांगितले की, असा काही संबंध लगेच जोडणे घाईचे होईल.