राजस्थानच्या टोंक जिल्हय़ात झालेल्या एक सभेमध्ये कथितरीत्या ‘आयसिस’ या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिरोझ, वासीम, मोहम्मद फहीद आणि वासिम अक्रम अशी चौघांची नावे असून ते २५ ते ३२ वर्षे वयोगटातील आहेत.
या चार आरोपींनी शुक्रवारी मालपुरा गावातील एका सभेत इतर अनेक लोकांसोबत आयसिसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे केलेल्या तपासादरम्यान चौघांची नावे कळल्यानंतर शनिवारी रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती तपास अधिकारी गोपीचंद यांनी दिली.धर्माच्या आधारावर परस्परशत्रुत्व भावनेला उत्तेजन देणे आणि ऐक्याला बाधा आणणारी कृत्ये करणे या आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ओळख पटलेल्या इतर आरोपींचा ते शोध घेत आहेत.