इस्लामशी संबंधित चिन्हे व अरेबिक भाषेतील मजकूर हलाल रेस्टॉरंट्स व फूड स्टॉल्सवरून ताबडतोब हटवा असा आदेश चिनी प्रशासनानं दिला आहे. चीनमधल्या मुस्लीम जनतेचं सांस्कृतिकदृष्ट्या चिनीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधल्या हलाल रेस्टॉरंट्समधल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, इस्लामशी संबंधित चिन्हे, अरेबिक भाषेतील मजकूर अशा सगळ्या गोष्टी फलकांवरून हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. इतकंच नाही तर हे कर्मचारी आदेशाचं पालन करत आहेत की नाही याची शहानिशाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. ही विदेशी संस्कृती असून तुम्ही चिनी संस्कृतीचा वापर केला पाहिजे असेही त्यांना बजावण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अर्थात, या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नावं सांगण्यास नकार दिला.

सर्व चिनी नागरिकांनी चीनच्या मुख्य सांस्कृतिक धारेशी स्वत:ला जोडायला हवे असा प्रयत्न चीन गेली तीन ते चार वर्षे करत असून त्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. मशिदीवर अरबी ठसा सांगणारे डोम काढायला लावून त्याजागी चिनी पॅगोडाची शैली आणण्यात आली होती. चीनमध्ये मुस्लीमांची संख्या दोन कोटी इतकी असून ते विशेषत: उघूर प्रांतात राहतात. चिनी मुस्लीमांना कम्युनिस्ट पार्टीच्या तत्वांकडे आणण्याचा सरकारकडून प्रयत्न गेली काही वर्षे करण्यात येत आहे.

मुस्लीमच नाही तर चिनी प्रशासनाचा बडगा ख्रिश्चनांनाही सोसावा लागला होता. अनेक चर्च बंद करण्यात आली तसेच बेकायदेशीर असल्याचे सांगत अनेक क्रॉस उतरवण्यात आले. परंतु उघूरमधल्या दंगलीनंतर विशेषत: मुस्लीमांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर चिनीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. झिंजिंयागमधल्या दहशतवादाविरोधात हल्ला असं या मोहिमेला चीननं संबोधलं आहे. परंतु पाश्चात्य देश तसेच मानवाधिकारांशी संबंधित संस्थांनी चीनचा निषेध केला आहे. तर, धार्मिक कट्टरता नष्ट करण्यासाठी हे आवश्यक असल्याची चीनची भूमिका आहे.

विदेशी हस्तक्षेपामुळे धार्मिक समूहांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं, त्यामुळेच अरेबिक शब्द व इस्लामिशी संबंधित चिन्हांवर चीनकडून बंदी घालण्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इस्लामचं अनुकरण करणाऱ्यांनीही चीनमध्ये चिनी भाषेतूनच व्यवहार करावा आणि चिनी संस्कृतीचा पुरस्कार करावा अरेबिक किंवा विदेशी नाही अशी चीन सरकारची अपेक्षा असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

बीजिंगमध्ये सुमारे एक हजार हलाल रेस्टॉरंट्स व फूड शॉप आहेत. या सगळ्यांवर तसेच आजुबाजुच्या प्रदेशातील रेस्टॉरंट्सवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अनेक रेस्टॉरंट्सनी अरेबिक अक्षरं चिनीमध्ये बदलली असल्याचं तसेच अरेबिक किंवा इस्लामिक चिन्हं झाकली असल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे.