Islamabad security high alert US Iran talks: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल होत असल्याने संपूर्ण शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रेड झोन आणि महत्त्वाच्या सरकारी इमारतींभोवती निमलष्करी दल तैनात असून कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पाकिस्तानला रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी व्हान्स यांनी इराणला स्पष्ट शब्दांत ताकीद दिली आहे.
जेडी व्हान्स यांची इराणला ताकीद
“इराणने या चर्चेचा उपयोग केवळ वेळकाढूपणासाठी करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा जेडी व्हान्स यांनी दिला आहे. या दोन देशांना एकत्र आणण्यासाठी पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चर्चेच्या यशावर केवळ मध्य पूर्वेतील शांतता नाही, तर जागतिक तेल बाजारपेठेचे भवितव्यही अवलंबून आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या बैठकीत मध्य पूर्वेतील संघर्ष, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करणे, यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
व्हान्स यांचा इशारा, ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स या चर्चेसाठी इस्लामाबादला पोहोचत आहेत. प्रवासादरम्यान त्यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला. “इराणने ही चर्चा गांभीर्याने घ्यावी, ही केवळ चर्चा नसून संघर्षावर तोडगा काढण्याची एक संधी आहे,” असे संकेत व्हान्स यांनी दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या “जगातील सर्वात शक्तिशाली रिसेट” या पोस्टनंतर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाकिस्तानमध्ये कडक सुरक्षा
चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात मोबाईल आणि इंटरनेट सेवांवरही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ही चर्चा जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
