Islamabad Mosque Blast : पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबाद येथे शुक्रवारी नमाजाच्या वेळी एका शिया मशिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. अलीकडच्या वर्षांतील शिया समाजावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मानला जात आहे. भारताने हा आत्मघाती बॉम्बस्फट घडवून आणल्याचा आरोप केला जात होता. मात्र, भारताने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

भारताने स्पष्ट केली भूमिका

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात भारताचं निवेदन सादर केलं आहे. ते म्हणाले, “इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट निषेधार्ह आहे आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल भारत शोक व्यक्त करतो. हे दुर्दैवी आहे की, आपल्या सामाजिक रचनेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी, पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत अडचणींवर इतरांना दोष देऊन स्वतःची फसवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. भारत अशा कोणत्याही आरोपांना नकार देतो, जो जितका निराधार आहे तितकाच तो निरर्थक आहे”, अशा कडक शब्दांत भारताने प्रतिक्रिया दिली आहे.

स्थानिक पत्रकारांनी एक्स वर शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी इस्लामाबादच्या शहजाद टाउनमधील तरलाई इमामबारगाहमध्ये झालेल्या स्फोटात किमान ५० जणांचा मृत्यू झाला आणि किमान १५० जण जखमी झाले. शुक्रवारच्या नमाजसाठी उपासक एकत्र येत असताना ही घटना घडली आणि प्राथमिक चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी याला आत्मघातकी बॉम्बस्फोट हल्ला म्हटले आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की बॉम्बस्फोट करण्यापूर्वी हल्लेखोराला मशिदीच्या गेटवर थांबवण्यात आले होते. माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, हल्लेखोर मशिदीच्या परिसरात घुसू शकला नाही कारण सुरक्षारक्षकांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखले होते.

काही आठवड्यांपूर्वी, पाकिस्ताननेही बलुचिस्तानमधील हल्ल्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. कडक सुरक्षेमुळे इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट दुर्मिळ आहेत, परंतु अलिकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचारात वाढ झाली आहे. सुमारे २४.१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अल्पसंख्याक असलेल्या शियांना भूतकाळात वारंवार सांप्रदायिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे.