मुस्लीम राष्ट्रांच्या संघटनेचे इस्रायलला आवाहन

दुबई : गाझा पट्टीत इस्रायल व हमास यांच्यादरम्यान सुरू असलेल्या तुंबळ युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे इस्रायलने थांबवावे, अशी मागणी मुस्लीम राष्ट्रांच्या एका मोठय़ा संघटनेने रविवारी केली. मात्र, इस्रायलला मान्यतेच्या मुद्दय़ावर या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये असलेली फूटही स्पष्ट झाली आहे.

५७ राष्ट्रे सदस्य असलेल्या सौदी अरेबिया स्थित इस्लामी सहकार्य संघटनेने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन – ओआयसी) रविवारी आपत्कालीन बैठकीनंतर एक निवेदन जारी केले. पूर्व जेरुसलेम या राजधानीसह पॅलेस्टिनी लोकांचे स्वतंत्र राष्ट्र असावे, या अनेक दशके जुन्या मागणीचा यात पुनरुच्चार करण्यात आला आहे. तथापि, या गटातील काही देशांनी इस्रायलशी संबंध सामान्य करण्याबाबत केलेले करार, तसेच हमासबद्दल त्यांना स्वत:ला असलेली चिंता यामुळे काही वेळा संघटनेचे प्रतिनिधी एकमेकांवर टीका करत असल्याचे दिसून आले.

‘पॅलेस्टिनी मुलांचा आज झालेला नरसंहार संबंध कथितरित्या सामान्य झाल्यानंतरचा आहे. मित्रत्वाचे संकेत केवळ इस्रायलकडून होणारे अत्याचार आणखी वाढवतात’, असे इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद झरीफ म्हणाले.

इस्लामधर्मीयांसाठी तिसऱ्या क्रमांकाची पवित्र मानल्या गेलेल्या अल-अक्सा मशिदीत मुस्लिमांच्या प्रवेशाच्या हक्काचा मान राखावा, तसेच पॅलेस्टिनी कुटुंबांना त्यांच्या घरांमधून बळजबरीने हलवणे थांबवावे, असे आवाहन ओआयसीने इस्रायलला केले.

‘पॅलेस्टिनी लोकांची दैना ही आज इस्लामी जगताची भळभळती जखम आहे,’ असे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार या बैठकीत बोलताना म्हणाले.

इस्रायलचे तुर्कस्तानशी राजनैतिक संबंध असले, तरी तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलट कॅवुसोग्लु यांनी संबंध सामान्य करण्याबाबत होणाऱ्या टीकेत सूर मिसळला.