अमेरिकच्या गुप्तचर विभागाने असे मूल्यांकन केले आहे की अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेटचा सहा महिन्यांत अमेरिकेवर हल्ला करण्याचा इरादा आहे असे पेंटागॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी काँग्रेसला सांगितले. संरक्षण खात्याचे सचिव कॉलिन काहल यांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तान अजूनही अमेरिकेसाठी गंभीर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु शकतो. अमेरिकेने ऑगस्टमध्ये दोन दशकांपासून सुरु असलेल युद्ध संपवले असले तरी किमान सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इस्लामिक स्टेटकडून हल्ला करण्यात येऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबानचा इस्लामिक स्टेट शत्रू आहे. आत्मघाती बॉम्बस्फोट आणि इतर हल्ल्यांच्या इस्लामिक स्टेटच्या दाव्यामुळे अमेरिकेने माघार घेतल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याचे प्रयत्न तालिबानने केले आहेत. ज्यामध्ये अल्पसंख्याक शिया पंथांना लक्ष्य करणारे बॉम्बस्फोट आणि पूर्वेकडील जलालाबाद शहरात तालिबान मिलिशिया दलाच्या सदस्यांचा इस्लामिक स्टेटने शिरच्छेद करणे यांचा समावेश होतो.

सिनेट समोर साक्ष देताना काहल म्हणाले की, ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडे इस्लामिक स्टेटशी प्रभावीपणे लढण्याची क्षमता आहे की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. अमेरिकेने तालिबान तसेच इस्लामिक स्टेट आणि अल कायदा सारख्या गटांशी लढा दिला आहे.

“तालिबान आणि आयएसआयएस-के हे प्राणघातक शत्रू आहेत ही आमची माहिती आहे. त्यामुळे तालिबान आयएसआयएस-केच्या मागे जाण्यासाठी खूप प्रेरित आहे. मला वाटते की, असे करण्याची त्यांची क्षमता तपासली पाहिजे,” असे काहल म्हणाले. काहल यांच्या अंदाजानुसार इस्लामिक स्टेटकडे काही हजार सैनिक आहेत. मात्र नवीन तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी म्हटले आहे की, “इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांकडून धोका टाळला जाईल. अफगाणिस्तान हा इतर देशांवर हल्ले करण्याचा तळ बनणार नाही.”

काहल यांनी म्हटले की अफगाणिस्तानातील अल कायदाने तालिबानशी असलेले त्यांचे संबंध लक्षात घेता अधिक जटिल समस्या बनली आहे. या संबंधांमुळेच २००१ मध्ये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनवर अल कायदाच्या ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाला चालना मिळाली. तालिबानने अल कायदाच्या नेत्यांना आश्रय दिला होता. अल-कायदाला अफगाणिस्तानबाहेर अमेरिकेवर हल्ले करण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी एक किंवा दोन वर्षे लागू शकतात, असेही काहल म्हणाले.

डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिका अफगाणिस्तानातून अल कायदा आणि इस्लामिक स्टेटकडून उद्भवणार्‍या धोक्यांपासून देशातील गुप्तचर यंत्रणा सावध करतील असे म्हटले होते.