कट्टरतावादी इस्लामिक विचारसरणी आणि हिंसेंसाठी इस्लामच्या नावासाठी प्रेरित करण्याच्या माध्यमातून होणारा इस्लामवाद हा जागतिक सुरक्षेसमोरचा सर्वात मोठा धोका ठरु शकतो असं मत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेमध्ये २००१ साली झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला यंदा २० वर्ष पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये थिंक टँक रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमध्ये (आरयूएसआय) भाषण देताना ब्लेअर यांनी हे वक्तव्य केलं आहे. माजी पंतप्रधान आणि इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल चेंजचे संस्थापक असणाऱ्या ब्लेअर यांनी अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेला ताबा हा कट्टरतावादी इस्लामिक विचारसणीच्या धोक्याकडे कानाडोळा करता येणार नाही असा इशारा देत असल्याचंही नमूद केलं आहे.

तालिबान ही संघटना जागतिक स्तरावर कट्टरतावादी इस्लामिक आंदोलनाचा एक भाग असल्याचं ब्लेअर यांनी सांगितले. तसेच या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग असल्याचा दावाही ब्लेअर यांनी केलाय. या सर्व संघटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची विचार करण्याची पद्धत आणि विचारसरणी सारखीच असल्याचंही ब्लेअर म्हणालेत.

नक्की वाचा >> तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”

“कट्टरतावादी इस्लाम हा इस्लामवादाला म्हणजेच धर्माला राजकीय सिद्धांत बनवण्यावर विश्वास ठेवतो. इतकचं नाही तर आपला हा हेतू साध्य करण्यासाठी सशस्त्र संघर्ष आवश्यक असल्यास तो सुद्धा योग्य असल्याचं या कट्टरतावादी विचारसरणीमध्ये मानलं जातं. इतर इस्लामवाद्यांनाही अशाच गोष्टींची अपेक्षा आहे. मात्र ते हिंसेपासून दूर राहतात. तरीही त्यांची विचारसरणी ही मुक्त, आधुनिक, सांस्कृतिक स्तरावर सहिष्णु समाजाच्या विचारसरणीसोबत विरोधाभास दर्शवणारी आहे. माझ्यामते इस्लामवाद, विचारसरणी आणि हिंसेच्या रुपामध्ये सुरक्षेसंदर्भातील प्रमुख धोका आहे. यावर आपण वेळीच अंकुश आणला नाही तर त्याचं नुकसान आपल्यालाच होणार आहे,” असं ब्लेअर म्हणालेत.

नक्की वाचा >> दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंड आहे तरी कोण?

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जागतिक परिस्थितीचं आकलन करताना सर्वसमावेशक विचार करणं आणि संवेदनशील परिस्थिती समजून घेणं गरजेचं असल्याचं मत ब्लेअर यांनी व्यक्त केलं आहे. कोव्हिड १९ ने घातक विषाणूसंदर्भात सर्वांना चांगलाच धडा शिकवला आहे असं ब्लेअर म्हणालेत. ज्यावेळी अलकायदाविरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखील नाटोने मोहीम सुरु केली होती त्यावेळी त्यात ब्रिटनचाही समावेश होता. ब्रिटनने नाटोच्या फौजांसोबत अलकायदाविरोधात युद्ध केलं तेव्हा ब्लेअर हेच ब्रिटनचे पंतप्रधान होते.