Captain Smit Machhar Israel Honor: ‘फ्लायदुबई’ विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्रायलकडून विशेष सन्मान केला जाईल, अशी घोषणा भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी केली आहे. हवेत असताना विमानावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांनी दाखवलेले असीम धैर्य, प्रसंगावधान आणि निर्धार यामुळेच सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचू शकले, असे सांगत अझार यांनी स्मित यांचा ‘खरा नायक’ असा गौरव केला. ‘न्यूज १८ इंडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

या घटनेचा उल्लेख करताना राजदूत अझार म्हणाले, “कॅप्टन स्मित मच्छार हे भारताचे एक महान सुपुत्र आहेत. इस्रायलचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, संसदेचे सभापती आणि संपूर्ण इस्रायलची जनता स्मित यांच्या या शौर्याबद्दल त्यांची सदैव ऋणी राहील. इस्रायलच्या संकटकाळात पाठीशी उभे राहणाऱ्यांना आमचा देश कधीही विसरत नाही. मी पूर्ण खात्रीने सांगतो की, कॅप्टन स्मित यांचा इस्रायलमध्ये यथोचित गौरव आणि सन्मान केला जाईल.”

रक्ताळलेल्या अवस्थेतही कॉकपिटचे दार उघडले

राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने कॅप्टन स्मित यांच्यावर चाकूने अचानक वार केले. गंभीर जखमी अवस्थेतही स्मित यांनी मोठ्या धैर्याने हल्लेखोराचा प्रतिकार केला आणि कॉकपिटचे दार उघडण्यात यश मिळवले. त्यामुळे बाहेरील प्रवाशांना आत शिरून परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दुसऱ्या वैमानिकाने विमानाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले. कॅप्टन स्मित यांनी अत्यंत शांत डोक्याने आणि अनुभवाच्या जोरावर दहशतवादाचा सामना करत तो हाणून पाडता येतो, हे कृतीतून सिद्ध केल्याचे अझार यांनी नमूद केले.

हल्ल्यामागे दहशतवादी कट?

या हल्ल्याच्या कारणांविषयी बोलताना राजदूत अझार यांनी स्पष्ट केले की, सध्या निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल. हल्लेखोराची कसून चौकशी, ‘ब्लॅक बॉक्स’ची तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतरच मूळ हेतू स्पष्ट होईल.

मात्र हा हल्ला दहशतवादी हल्ल्यासारखाच वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. “७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे, हा अत्यंत महत्त्वाचा पैलू असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलदरम्यान दररोज धावणाऱ्या सुमारे १० ‘फ्लायदुबई’ विमानांपैकी हे एक होते. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करणाऱ्या ‘अब्राहम करारा’ला बाधा पोहोचवण्याचा हा कट असू शकतो. जेव्हा जेव्हा इस्रायल आणि अरब जगतामधील सहकार्य वाढते, तेव्हा ते उधळण्याचा प्रयत्न काही घटक करतात; पण ते यात कधीही यशस्वी होणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.

कुटुंबीयांच्या सतत संपर्कात

या संपूर्ण प्रकरणाबाबत इस्रायल सरकार भारत सरकारशी सातत्याने समन्वय साधून आहे. तसेच इस्रायली दूतावास कॅप्टन स्मित यांच्या कुटुंबीयांच्या नियमित संपर्कात असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, अशी माहितीही राजदूत रुवेन अझार यांनी दिली.