Israel Ambassador Reuven Azhar explains Iran strike post PM Modi’s visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच इस्रायल देशाल भेट दिली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी इस्रायल दौरा केला होता. ते इस्रायलमधून परत येताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात युद्ध छेडलं. त्यामुळे मोदींच्या इस्रायल दौऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला भेट दिली तेव्हा इराणवरील हल्ल्याबाबत काहीच नियोजन नव्हतं, असं इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. इराणवर हल्ला करण्याचे प्रयत्न इस्रायलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते, पण योग्य वेळेची वाट पाहिली जात होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायल भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिन्यामिन नेतन्याहू यांच्यात २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेनंतर भारत आणि इस्रायलने त्यांचे संबंध विशेष धोरणात्मक भागीदारी (Special Strategic Partnership) स्तरावर नेले आणि १७ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याच्या दोन दिवसांनंतर, अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध मोहीम सुरू केली.
मोदी भारतात परतले अन्…
मुलाखतीत अझर म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान इराणवर असे हल्ले होतील याची माहिती नव्हती. पंतप्रधान मोदी इस्रायलमधून भारतात परतल्यानंतर ही लष्करी संधी निर्माण झाली. अर्थात, त्यांच्या भेटीदरम्यान आम्ही प्रादेशिक विकासावर चर्चा केली, पण जी गोष्ट आम्हालाच माहीत नव्हती, ती आम्ही त्यांच्याशी शेअर करू शकलो नाही”, असं त्यांनी स्पष्ट केले.
इराणविरोधात पूर्वीपासूनच तयारी सुरू
हल्ल्यांच्या तयारीबद्दल बोलताना अझर म्हणाले की, इस्रायल अनेक दशकांपासून इराणविरोधात लढत आहे. त्यामुळे इराणी राजवट, त्यांची लष्करी यंत्रणा, निर्णय घेणारे लोक आणि त्यांचे स्थान समजून घेण्यासाठी इस्रायलला गुप्तचर क्षमता विकसित करणे आवश्यक होते. या धोक्याचे स्वरूप लक्षात घेऊन इस्रायलने गेल्या काही वर्षांत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा मोडीत काढण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
अझर पुढे म्हणाले की, इस्रायलने केवळ इराणकडूनच नव्हे, तर त्यांच्या प्रॉक्सी गटांकडून होणारा क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा मारा रोखण्यासाठी विविध संरक्षण प्रणाली विकसित केल्या आहेत. अब्राहम करारांमुळे (Abraham Accords) आम्हाला मध्यपूर्वेतील हवाई पाळत ठेवण्यासाठी आणि लष्करी कारवायांसाठी अमेरिकन सैन्याच्या ‘सेंटकॉम’ (CENTCOM) सोबत समन्वय साधणे शक्य झाले आहे. “
“आम्ही बराच काळ अमेरिकेसोबत समन्वय साधत होतो आणि योग्य क्षणाची वाट पाहत होतो. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या वेळी आम्हाला हा हल्ला कधी होईल हे माहीत नव्हते. ते गेल्यानंतर दोन दिवसांनी ही संधी मिळाली आणि शनिवारी सकाळी सुरक्षा कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यावर आम्ही ही मोहीम राबवली”, असे त्यांनी सांगितले.
