Israel attacks Lebanon: अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका-इराण शांतता करारात लेबनॉनचा देखील समावेश असताना इस्रायलकडून कराराचे उल्लंघन करत हल्ला केल्याचे वृत्त नॅशनल न्यूज एजन्सीने दिले आहे. पश्चिम आशियातील युद्ध समाप्तीसाठी महत्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या या कराराकडे पाहिले जात असताना इस्रायल लेबनॉनविरुद्धच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हल्ल्यात अनेक लोक जखमी

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इस्रायलने खाईम येथे हल्ला केला असून, ख्पार टेबनीट येथील एका कारवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यासह विविध भागात देखील हल्ले झाल्याचा उल्लेख वृत्तात करण्यात आला आहे. शांतता कराराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलकडून लेबनॉनवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे आता अमेरिका आणि इराणच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

गाझामध्येच राहणार सैन्य, इस्रायलची भूमिका

“अनिश्चित काळासाठी इस्रायली सैन्य गाझा, सिरिया आणि दक्षिण लेबनॉनमध्येच तैनात राहील”, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी स्पष्ट केले आहे. ०७ ऑक्टोबर २०२३ मधील हमासच्या हल्ल्यानंतर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता सैन्य लेबनॉनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे काट्ज यांनी सांगितले. सीमाभागातील संवेदनशील क्षेत्रात सैन्य ठेवण्याचा निर्णय नेतान्याहू सरकारने घेतल्याचेही त्यांनी पुढे सांगतिले. “जिहादी विचारधारेविरोधात लढण्यासाठी आणि इस्रायली नागरिक आणि सीमेच्या सुरक्षेसाठी सैन्य लेबनॉन, सिरिया आणि गाझामध्ये राहील”, असे काट्ज म्हणाले.

इस्रायलने स्पष्ट केली भूमिका

“०७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेतून हाच धडा घेतला आहे. लेबनॉनमधून सैन्य हटविण्याच्या आम्ही तीव्र विरोधात आहोत, यासाठी कोणताही आता होणाऱ्या किंवा भविष्यातील विरोधाला आम्ही जुमानत नाही”, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले. हमास हल्ल्यानंतर सुरक्षेचे कारण देत इस्रायलने गाझापट्टीसह लेबनॉन, सिरिया भागाचा ताबा घेतला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारात युद्धविराम वाढीसह होर्मुझ पुन्हा खुली करणे आणि लेबनॉनसह सर्वत्र हल्ले थांबविण्याच्या अटींचा समावेश आहे.