इस्त्रायल मध्य पूर्वेत कुठल्याही ठिकाणचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यावर काम करत आहे अशी माहिती इस्त्रायलचे संरक्षण मंत्री अविगडॉर लायबरमॅन यांनी दिली. इस्त्रायल मिलिट्री इंडस्ट्रीज ही शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारी सरकारी कंपनी पुढच्या काही वर्षात मध्य पूर्वेसाठी खास अशी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करेल असे त्यांनी सांगितले.

अचूकतेने लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरु आहे. काही भागांची निर्मिती सुरु झाली आहे तर काही भाग संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहे असे अविगडॉर लायबरमॅन यांनी सांगितले. नव्या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे इस्त्रायलची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होईल. इस्त्रायल हा मध्यपूर्वेतील लष्करी ताकत असलेला शक्तीशाली देश असून त्या प्रदेशातील अण्वस्त्र संपन्न असा एकमेव देश आहे.

इस्त्रायलकडे जी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत ती अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत असे परदेशातील लष्करी तज्ञांचे म्हणणे आहे. आयएमआयने २००४ साली २५० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेले क्रूझ मिसाइल विकसित केले. इस्त्रायलकडे त्यांच्या दिशेने आलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा आहे. आयएमआयकडून विकसित होत असलेल्या नव्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामुळे त्यांच्या मारक क्षमतेमध्ये अधिक अचूकता येणार आहे.

पॅलेस्टाईनसह शेजारच्या अरब देशांबरोबर इस्त्रायलचे पूर्वीपासून वाद आहेत. इराणपासून आपल्याला सर्वाधिक धोका असल्याचे इस्त्रायलचे मत आहे. गाझा पट्टीत इस्त्रायली सैन्य आणि हमासमध्ये नेहमीच संघर्ष सुरु असतो. हमासकडून इस्त्रायलच्या सीमावर्ती भागात रॉकेट हल्ले केले जातात. इस्त्रायलकडूनही या हल्ल्यांना तसेच उत्तर दिले जाते. काही महिन्यांपूर्वी इस्त्रायलची गुप्तचर संघटना मोसादने इराणमध्ये जाऊन त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सर्व माहिती चोरली होती. काही तासांच्या आता इस्त्रायलयाच्या गुप्तचरांनी हे धोकादायक मिशन पार पाडले होते.