US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही थांबलेलं नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता इराणचे दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. सध्याही अमेरिका-इस्रायल हे इराणवर जोरदार हल्ले करत आहेत, तर इराण देखील प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.
असं असतानाच इस्रायलने पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना आम्ही शोधू आणि संपवून टाकू’, असा इशारा एफी डेफ्रिन यांनी दिला. त्यामुळे इराणमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी काय म्हटलं?
इस्रायलच्या लष्कराने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवण्याची धमकी दिली आहे. “आम्ही त्यांना (मोजतबा खामेनी) शोधून काढू आणि संपवून टाकू”, असं ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी म्हटलं आहे. तसेच मोजतबा खामेनी सुरक्षित नाहीत. इस्रायलच्या मोहिमेचा भाग म्हणून त्यांना शोधून काढलं जाईल, असंही एफी डेफ्रिन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं असल्याचं वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.
दरम्यान, ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी असंही स्पष्ट केलं की, “इस्रायलचा दृष्टिकोन अपरिवर्तित राहील. आम्ही सिद्ध केल्याप्रमाणे इस्रायल राष्ट्राला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येकाचा पाठलाग करणं आम्ही सुरूच ठेवणार आहोत. मग जो कोणी आमच्या विरोधात हात उचलेल तो आमच्यापासून सुरक्षित नाही”, असा इशाराही एफी डेफ्रिन यांनी दिला.
सुरक्षा अधिकारी अली लारिजानी हल्ल्यात ठार, इराणची पुष्टी
सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याची इराणकडून पुष्टी करण्यात आली आहे. इस्रायलने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. सुरुवातीला हा दावा फेटाळल्यानंतर आता इराणने लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी इराणने केली. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर हा दुसरा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.
दोन वरिष्ठ अधिकारी ठार
इराणच्या उच्च स्तरावरील सुरक्षा अधिकारी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे बसिज गटाचे प्रमुख मारले गेले असल्याचा दावा इस्रायलने मंगळवारी केला होता. यात इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. ६७ वर्षीय लारिजानी अयातुल्ला खामेनी यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे अधिकारी मानले जात होते. तसेच इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अंगरक्षकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
