तेल अविव : इस्रायलच्या निवडणुकीत अरबांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षांनी घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी केला आहे. तिथे मतमोजणी अजूनही सुरू असून अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, अरबांच्या पक्षांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर नेतान्याहू यांनी या पक्षांवर फसवणूक केल्याचा आरोप केला, तसेच सरकार स्थापनेसाठी त्यांचा पाठिंबा घेणार नसल्याचेही जाहीर केले.

इस्रायलच्या निवडणुकीत परदेशी हस्तक्षेप आणि परदेशी निधीचा वापर झाल्याचे नेतान्याहू यांचे म्हणणे आहे. सेंट्रल इलेक्शन कमिटीचे जस्टिस नोआम सोलबर्ग यांनी शिन बेट या अंतर्गत सुरक्षा संस्थेचे प्रमुख डेव्हिड झिनी यांना नेतान्याहू यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नेतान्याहू यांनी ‘युनायटेड अरब लिस्ट’ व ’जॉइंट लिस्ट आघाडी’ यांना लक्ष्य करत समाजमाध्यमांवर लिहिले की, अरबी पक्षांनी हा भूकंप घडवला आहे, त्यांनी इस्रायलच्या निवडणुका चोरल्या!

इस्रायलच्या क्नेसेटसाठी मंगळवारी निवडणूक झाली. क्नेसेटचे एकूण संख्याबळ १२० इतके आहे. आतापर्यंत हाती आलेले मतमोजणीचे कल पाहता, पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या लिकुड आणि विरोधी नेते गाडी आयसेनकोट यांच्या यशर, या दोन्ही पक्षांच्या आघाड्यांना बहुमतासाठी आवश्यक ६१ जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.

जवळपास ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नेतान्याहू यांच्या आघाडीला ५३ तर आयसेनकोट यांच्या आघाडीला ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे अरबांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षांना १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ज्यू मतदारांना दुखावण्याच्या भीतीमुळे, सध्या तरी दोन्ही आघाड्यांनी अरब पक्षांचा पाठिंबा न घेण्याची भूमिका घेतली आहे.