इस्रायलमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. इस्रायलच्या ‘क्नेसेट’ या सर्वोच्च कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी २७ ऑक्टोबरला मतदान पार पडलं. पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. आता या निवडणुकीची सर्व मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या आघाडीला बहुमत मिळवण्यात अपयश आलं आहे.
इस्रायलच्या संसदीय निवडणुकीतील सर्व मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या निकालानुसार नेतान्याहू यांच्या गटाला केवळ ५३ जागा मिळाल्या असून बहुमताचा ६१ चा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये सरकार स्थापनेवरून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सर्व मतांच्या मोजणीनंतर नेतान्याहू यांच्या सत्ताधारी आघाडीने ५३ जागा मिळवल्या आहेत, तर विरोधी पक्षांच्या आघाडीला ४८ आणि अरब पक्षांना १९ जागा मिळाल्या आहेत. या निकालामध्ये कोणत्याही राजकीय गटाकडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ६१ जागा नाहीत. त्यामुळे देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, इस्रायलच्या या निवडणुकीत क्नेसेटमधील १२० जागांसाठी सर्वच पक्षांत अटीतटीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
कोणत्या पक्षाला किती जागा?
इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने विशेष मतपत्रिकांची मोजणी पूर्ण केल्यानंतर हे अंतिम आकडे समोर आले आहेत. यामध्ये सैनिक, कैदी, परदेशात असलेले मुत्सद्दी आणि रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व मतदारांचा समावेश आहे. जे आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकले नव्हते.
‘लिकुड’ सर्वात मोठा पक्ष ठरला
या निकालानुसार, नेतान्याहू यांच्या ‘लिकुड’ पक्षाने २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच इतर पक्षांचा विचार करता ‘याशार’ पक्ष २१ जागांवर विजयी झाला आहे. B Yachad ला १२ आणि जॉइंट लिस्टला ११ जागा मिळाल्या आहेत. तसेच ‘डेमोक्रॅट्स’ आणि ‘राम’ (Ra’am) यांनी प्रत्येकी ८ जागा मिळवल्या आहेत. तसेच युनायटेड तोराह ज्युडाईझम, इस्रायल बेतेनू आणि ओत्झमा येहुदित या पक्षांना प्रत्येकी ७ जागांवर विजय मिळाला आहे. तसेच रिलिजियस झिओनिझम आणि ‘शास’ पक्षाला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक समितीने सांगितलं की, मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली असली तरी अधिकृत अंतिम निकाल नंतर जाहीर केले जाणार आहेत.
इस्रायलमध्ये आता पुढे काय होईल?
आकडेवारीनुसार, नेतान्याहू आणि त्यांच्या विरोधकांसमोर सरकार स्थापन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. विरोधी गटाकडेही बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६१ जागा नाहीत आणि नेतान्याहू यांच्या आघाडीकडेही नाहीत. त्यामुळे आता पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना अरब पक्षांच्या पाठिंब्यावर किंवा सहकार्यावर अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे. जर कोणतीही सक्षम युती सरकार स्थापन करू शकली नाही तर देशाला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं.
‘अरब पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार अशक्य’ : नेतान्याहू
मतदान संपल्यानंतर देशवासियांशी संवाद साधताना नेतान्याहू यांनी देशात नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणुकीत अरब पक्षांनी लक्षणीय जागा मिळवल्या असल्या तरी कोणत्याही नेत्याने त्यांच्या टेकूवर सत्ता चालवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘नेतान्याहूंवर अविश्वासाचा शिक्का’ : आयसेनकोट
दुसरीकडे तेल अवीव येथे समर्थकांना संबोधित करताना गाडी आयसेनकोट यांनी एक्झिट पोल म्हणजे नेतान्याहू यांच्यावरील अविश्वासाचा पुरावा असल्याचे सांगितले. तसेच देशात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला. याच वेळी नेतान्याहू यांच्या इराणवरील संभाव्य युद्धाच्या भूमिकेवर निशाणा साधत त्यांनी थेट इशारा दिला.
