इस्रायलच्या ‘क्नेसेट’ या सर्वोच्च कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी २७ ऑक्टोबरला मतदान पार पडलं, तेव्हापासून इस्रायलच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. खरं तर पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या निवडणुकीत पंतप्रधान नेतान्याहू यांच्या आघाडीला बहुमत मिळवण्यात अपयश आलं आहे. नेतान्याहू यांच्या गटाला फक्त ५३ जागा मिळाल्या असून बहुमताचा ६१ चा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये सरकार स्थापनेवरून मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
इस्रायलमध्ये सर्वच पक्षाला सरकार स्थापन करणं अवघड झालं आहे. देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता इस्रायलमधील पुढील घडामोडींबाबत मोठी उत्सुकता लागलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधकांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षांकडून नेतान्याहू यांना हटवण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे.
नेतान्याहू यांच्या सत्ताधारी आघाडीने ५३ जागा मिळवल्या आहेत, तर विरोधी पक्षांच्या आघाडीला ४८ आणि अरब पक्षांना १९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत क्नेसेटमधील १२० जागांसाठी सर्वच पक्षांत अटीतटीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, इस्रायलच्या संसदेत १२० जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी ६१ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. पण कोणत्याही प्रमुख गटाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.
दरम्यान, ‘राआम’ (Ra’am) आणि ‘जॉइंट लिस्ट’ या दोन प्रमुख अरब पक्षांनी एकत्रितपणे १९ जागा जिंकल्या आहेत. आता हे दोन पक्ष पंतप्रधान नेतान्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने वृत्त दिलं आहे.
वृत्तानुसार, ‘जॉइंट लिस्ट’ पक्ष विरोधी पक्षांना बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र ‘जॉइंट लिस्ट’ पक्षाला स्वतः सरकारमध्ये सामील व्हायचं नाही, असं ‘क्नेसेट’चे सदस्य अहमद तिबी यांनी म्हटलं आहे. “आम्ही अशा कोणालाही मदत करण्यास तयार आहोत, ज्यांना हे सरकार पाडायचं आहे आणि त्याऐवजी दुसरं सरकार आणायचं आहे. आम्हाला या सत्ताबदलाचा भाग बनायचं आहे”, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अरब राजकीय चळवळीतील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व जाफर फराह यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितलं की, ‘राआम’ आणि ‘जॉइंट लिस्ट’ हे दोन्ही पक्ष इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांना भेटून, आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला पाठिंबा देण्याची आपली तयारी दर्शवतील. तसेच फराह यांच्या मते हे दोन्ही पक्ष गॅडी आयसेनकोट यांची पुढील पंतप्रधान म्हणून शिफारस करतील.
कोणत्या पक्षाला किती जागा? ‘लिकुड’ सर्वात मोठा पक्ष ठरला
इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने विशेष मतपत्रिकांची मोजणी पूर्ण केल्यानंतर अंतिम आकडे समोर आले आहेत. या निकालानुसार, नेतान्याहू यांच्या ‘लिकुड’ पक्षाने २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच इतर पक्षांचा विचार करता ‘याशार’ पक्ष २१ जागांवर विजयी झाला आहे. B Yachad ला १२ आणि जॉइंट लिस्टला ११ जागा मिळाल्या आहेत. तसेच ‘डेमोक्रॅट्स’ आणि ‘राआम’ (Ra’am) यांनी प्रत्येकी ८ जागा मिळवल्या आहेत. तसेच युनायटेड तोराह ज्युडाईझम, इस्रायल बेतेनू आणि ओत्झमा येहुदित या पक्षांना प्रत्येकी ७ जागांवर विजय मिळाला आहे. तसेच रिलिजियस झिओनिझम आणि ‘शास’ पक्षाला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत.
