वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
गाझामध्ये ६० दिवस युद्धविराम करण्यास इस्रायलने सहमती दर्शवली आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांन मंगळवारी दिली. कराराच्या अटी अधिक कठोर होण्यापूर्वी हमासनेही तो स्वीकारावा असा इशारा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर दिला. दरम्यान, आपण युद्धविरामासाठी तयार आहोत असे हमासने बुधवारी सूचित केले, पण करार स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले नाही.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून ते सोमवारी ट्रम्प यांच्याबरोबर व्हाइट हाऊसमध्ये चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी युद्धविरामासंबंधी घोषणा केली आहे. याचा अंतिम कराराचा मसुदा इजिप्त आणि कतारकडून तयार केला जाईल असेही त्यांनी जाहीर केले. गाझामधील युद्ध थांबवावे आणि हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका केली जावी यासाठी ट्रम्प अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमासवर दबाव वाढवत आहेत.
यापूर्वी मार्चमध्ये, ट्रम्प यांच्या दबावामुळे हमास आणि इस्रायलदरम्यान युद्धविरामाचा करार झाला होता. त्यावेळी हमासच्या ताब्यातील काही ओलीस आणि इस्रायलच्या तुरुंगांमधील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटकाही करण्यात आली होती. अजूनही जवळपास ५० ओलीस हमासच्या ताब्यात आहेत. नंतर इस्रायलने युद्धविराम संपवला आणि गाझावरील हल्ले अधिक तीव्र केले. आतापर्यंत या युद्धामध्ये गाझामधील ५६ हजारांपेक्षा पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
माझ्या प्रतिनिधींनी आज गाझाच्या मुद्द्यावर इस्रायलच्या नेत्यांबरोबर दीर्घ आणि उत्पादक चर्चा केली. गाझातील ६० दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटी इस्रायलने मान्य केल्या आहेत. या काळात युद्ध संपवण्यासाठी आम्ही सर्व पक्षांबरोबर काम करू. पश्चिम आशियाच्या हितासाठी हमास हा करार स्वीकारेल अशी मला आशा आहे. यापेक्षा चांगला करार त्यांना मिळणार नाही, वाईटच मिळेल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हमासची तयारी, पण घोषणा नाही
युद्धविराम स्वीकारण्यास आपली तयारी असल्याचे हमासने बुधवारी सूचित केले, पण तो स्वीकारत असल्याची घोषणा केली नाही. कतार आणि इजिप्तच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर हमास याविषयी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. आम्हाला युद्ध कायमचे थांबवायचे आहे असे या संघटनेकडून सांगण्यात आले. युद्धविराम स्वीकारल्यास युद्ध खरोखर थांबेल का, असा प्रश्न हमासचा नेता ताहेर अल-नुनू याने विचारला. इस्रायली फौजांनी गाझामधून माघार घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.