Us Israel Iran War Updates: इस्त्रायल आणि अमेरिकेचे इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शनिवारी (७ मार्च) पहाटे इस्त्रायलने इराणच्या तेहरानमधील विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्त्रायलमधील प्रमुख शहर असलेल्या तेल अवीववर क्षेपणास्त्रांचा मारा केला. तसेच इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या मालमत्ता आणि सैनिक तळ असलेल्या काही ठिकाणांवरही हल्ले केले. मात्र, हे हल्ले रोखण्यात यश आल्याचे सौदी अरेबियाने सांगितले आहे.

अमेरिकेकडून या युद्धात नौदलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकन युद्धनौका या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे की, अमेरिका इराणवर मोठा हल्ला करू शकते. त्यावर प्रत्युत्तर देताना इराणने आम्ही सहा महिने महायुद्ध लढू शकतो, असा दावा केला आहे. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने हा दावा केला आहे.

इंधन केंद्रांवर हल्ला

दरम्यान, इस्त्रायलने इराणच्या इंधन साठवणूक केंद्रांवरही हल्ले केले आहेत. याबाबतची माहिती इस्त्रायलच्या ‘आयडीएफ’ने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तेहरानमधील आयआरजीसीच्या मालकीची अनेक इंधन साठवणूक केंद्रे नष्ट करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी आयडीएफच्या गुप्तचर यंत्रणेची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आयएएफ’ने या केंद्रांवर हल्ले केले. या ठिकाणांहून इराण आपल्या लष्करासाठी आवश्यक इंधन साठवून त्याचे वितरण करत होता. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा आयडीएफने केला आहे.

२०० ठिकाणांना लक्ष्य

दरम्यान, इराण अमेरिका आणि इस्त्रायलविरुद्ध किमान सहा महिने तीव्र युद्ध लढू शकतो, असे वृत्त ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या हवाल्याने दिले आहे. गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांच्या म्हणण्यानुसार, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सशस्त्र दल सध्याच्या कारवायांच्या वेगाने किमान सहा महिने तीव्र युद्ध सुरू ठेवण्यास सक्षम आहे.” इराणने अमेरिकन आणि इस्त्रायली तळ तसेच सुविधांशी संबंधित २०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावाही केला आहे.