वृत्तसंस्था, जेरुसलेम
इराणवर हवाई हल्ले करताना तेथील राजवट उलथून लावण्यासाठी इस्रायलकडे कोणतीही स्पष्ट योजना नव्हती, असे अनेक सुरक्षा सूत्रांनी ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्राला सांगितले आहे. या हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या नेत्यांविरोधात जनमत तयार होऊन तिथे नेतृत्वबदल होईल, अशी इस्रायलची अपेक्षा होती. मात्र, त्याला पुष्टी करणारी कोणतीही ठोस माहिती आपल्याकडे नव्हती, असे या सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.
युद्धाला सुरुवात करताना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर इराणमध्ये सत्ताबदल घडवण्याचे उद्दिष्ट होते. पण लवकरच या युद्धाला इराणच्या अस्तित्वाच्या लढाईचे स्वरूप प्राप्त झाले. इराणवर हवाई हल्ला करून तेथील राजवट बदलता येईल, अशी अपेक्षा अवास्तव असल्याचे मत काही आजी-माजी तज्ज्ञांनी व्यक्त केले. युद्ध सुरू होण्यापूर्वी आर्थिक कारणावरून इराणमध्ये असंतोष निर्माण झाला होता. मात्र, युद्ध सुरू असताना पुन्हा एकदा असंतोष वाढण्याची शक्यता अतिशय दुर्मीळ आहे, असे मत मोसादच्या संशोधन विभागाच्या माजी प्रमुख सिमा शाइन यांनी व्यक्त केले.
तर, “इराणमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बाहेर कसे काढायचे, अणुकेंद्रावरील परिस्थिती कशी हाताळायची, इराणमधील लष्करी उद्योगावर कशी कारवाई करायची याबद्दल आमच्याकडे योजना असायच्या. पण हवेतून हल्ले करून सत्ताबदलासाठी मोहीम कशी राबवायची याबद्दल आम्ही कधीही काही ऐकले नाही,” असे गुप्तचर विभागातील एका सूत्राने सांगितले.
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर २८ फेब्रुवारीला हल्ले सुरू केल्यापासून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे तिथे सत्ताबदल झालेला नाही किंवा तो देश शरणही आलेला नाही. हल्ल्यांच्या सुरुवातीच्या २४ तासांमध्येच सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी आणि लष्करप्रमुखांसह अनेक महत्त्वाचे नेते ठार झाले. यानंतर इराण नेतृत्वहीन होऊन तिथे आपल्या पसंतीचा नेता निवडला जाईल, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे जाहीरपणे विधानही केले. तर कोणताही नेता निवडला गेला तरी त्याला ठार केले जाईल, अशी धमकी इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी दिली होती.
इराण अण्वस्त्रसज्ज होण्याची भीती
इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातोल्ला मोज्तबा खामेनी यांना नेतृत्वावर पकड मिळवता आली तर ते लवकरच अण्वस्त्रांची निर्मिती करतील, असे मत इस्रायलच्या विद्यमान आणि माजी संरक्षण आणि गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी ‘द गार्डियन’ला सांगितले. इराणकडे सध्या ४४० किलो समृद्ध युरेनियम आहे, त्यातून किमान १० अण्वस्त्रांची निर्मिती शक्य असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे. एकतर हे युरेनियम इराणबाहेर काढता आले पाहिजे किंवा ते इराणमध्येच अतिशय सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली पाहिजे असे या इराणसंबंधी काम केलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आपल्याकडे अण्वस्त्रे असली तरच निभाव लागेल, असे इराणमधील अनेक कट्टरवादी विचारसरणीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इस्रायलने ज्या युद्धसज्जतेचे प्रदर्शन केले आहे, त्यामुळे या विचाराला चालना मिळण्याची भीती या सूत्रांनी व्यक्त केली.
